नक्षल्यांच्या फ्रंट ऑर्गनायझेशनवर नजर : गडचिरोलीतील स्फोटाने सुरक्षा यंत्रणा सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 09:21 PM2019-05-02T21:21:58+5:302019-05-02T21:23:24+5:30
रस्त्यात स्फोट घडवून गडचिरोलीतील १५ पोलिसांसह १६ जणांचा बळी घेणाऱ्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याने सर्वत्र रोष निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांनी ठिकठिकाणच्या फ्रंट ऑर्गनायझेशनवर (समर्थक) नजर रोखली आहे. त्यांच्या हालचालीचीही नोंद घेतली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यात स्फोट घडवून गडचिरोलीतील १५ पोलिसांसह १६ जणांचा बळी घेणाऱ्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याने सर्वत्र रोष निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांनी ठिकठिकाणच्या फ्रंट ऑर्गनायझेशनवर (समर्थक) नजर रोखली आहे. त्यांच्या हालचालीचीही नोंद घेतली जात आहे.
बुधवारी १ मे रोजीचा शासकीय कार्यक्रमाचा बंदोबस्त आटोपून कर्तव्यावर निघालेल्या गडचिरोलीतील पोलिसांच्या वाहनाला कुरखेडा तालुक्यातील मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून उडवून दिले. या स्फोटात १५ जवान आणि एक वाहनचालक असे १६ जण शहीद झाले. नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते. शहीद झालेल्या जवानांपैकी बहुतांश जण त्यांच्या कुटुंबाचे कर्ते आणि एकमात्र आधार होते. त्यांच्या देहाच्या चिंधड्या करून नक्षल्यांनी क्रूरतेचा कळस गाठला. मात्र, नक्षल्यांच्या बाजूने बोलणाऱ्या किंवा मानवाधिकारी पिपाणी वाजविणाऱ्या एकाही संघटनेने याबाबत निषेधाचे साधे पत्र काढलेले नाही. पोलिसांच्या गोळीबारात नक्षलवादी ठार झाला किंवा नक्षलवादी समर्थक म्हणून कुणाला अटक करण्यात आल्यास त्यांच्यावतीने कथित समाजसेवक लगेच पुढे येतात. ती कारवाई किंवा पोलिसांचा गोळीबार कसा निष्ठूर आणि बेकायदेशीर आहे, त्याबाबत आरडाओरड केली जाते. पत्रकार परिषदा घेऊन निषेध नोंदवतानाच पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते.
सर्वसामान्य नागरिकांच्या जानमालाची सुरक्षा करण्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या गडचिरोलीतील १५ पोलिसांसह १६ जणांच्या देहाच्या चिंधड्या नक्षलवाद्यांनी उडविल्या. या १६ जणांच्या कुटुंबीयांचा आक्रोश अनेकांच्या काळजाचे पाणी करणारा आहे. मात्र, नक्षल्यांनी घडविलेल्या या भीषण स्फोटाचा मानवाधिकार जोपासण्याची भाषा वापरणाऱ्या कथित समाजसेवकांकडून निषेध नोंदविण्यात आला नाही. मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही त्यांच्यापैकी कुणाकडून झाले नाही किंवा त्यांच्यासाठी मदतीचा हातही कुणी पुढे केलेला नाही.
कारवाईचे संकेत
नक्षल्यांच्या बाजूने सहानुभूतीचे वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आणि नक्षल्यांच्या क्रूर कृत्याचे एकप्रकारे छुुप्या पद्धतीने समर्थन करणाºया या नक्षल समर्थकांची आता काय भूमिका आहे, त्यांच्या काय हालचाली आहे, ते जाणून घेण्याचे तपास यंत्रणांनी प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्यावर नजर रोखण्यात आली असून, पुढच्या काही दिवसांत शहरी नक्षलवादाच्या संबंधाने विविध शहरात कारवाईच्या रुपाने घडामोडी होण्याचे संकेत मिळाले आहेत.