विदेशी झाडांच्या मुळ्या सैल; वारे-वादळात ते कोसळणारच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 12:31 PM2021-10-10T12:31:03+5:302021-10-10T18:31:53+5:30
पावसाळा किंवा उन्हाळ्यातही वादळ आले की, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडण्याचे किंवा त्यांच्या फांद्या तुटण्याचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र नीट अभ्यास केला की, काही विशिष्ट प्रजातीचीच झाडे उन्मळून पडण्याचा प्रकार लक्षात येताे. यामध्ये विदेशी झाडांचे प्रमाण सर्वाधिक असते.
नागपूर : अलीकडच्या काळात ८० टक्क्यांपेक्षा जास्त लावण्यात आलेली झाडे विदेशी जातीची आहेत. ही झाडे फार कष्ट न घेता पटकन वाढतात, उंच होतात आणि डोळ्यांना हिरवी दिसतात. त्यामुळे, अगदी सहजपणे आपल्याकडे विदेशी झाडे लावली जातात. मात्र, ही झाडे जैवविविधता नष्ट करण्यास कारणीभूत ठरत आहे.
परतीच्या पावसात राज्यात अनेक ठिकाणे वादळ वाऱ्यामुळे झाडे कोसळून पडण्याच्या घटना घडल्या. अलिकडे अशा घटना वाढल्या आहेत. वास्तविक पावसाळा किंवा उन्हाळ्यातही वादळ आले की, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडण्याचे किंवा त्यांच्या फांद्या तुटण्याचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र नीट अभ्यास केला की, काही विशिष्ट प्रजातीचीच झाडे उन्मळून पडण्याचा प्रकार तुमच्या लक्षात येऊ शकताे. यामध्ये विदेशी झाडांचे प्रमाण सर्वाधिक असते. विदेशी झाडे लावल्यामुळे या घटना वाढल्याचे वनस्पती अभ्यासकांचे मत आहे.
देशी झाडे लावा
आपल्या देशात अनेक प्रजातीची झाडे आहेत जी दीडशे-दाेनशे वर्ष मजबुतीने उभी आहेत. शहरातही ही झाडे सहज दिसू शकतात. आंबा, वड, पिंपळ, चिंच, कडूलिंब, कवट, शिशम, बेहडा, करंज या प्रजातीची झाडे लावल्यास ती वर्षाेनुवर्षे टिकून राहतात. घर परिसरात आंबा, पारिजात, कडूलिंब, बकुळ, सीताफळ, लिंबू आदी प्रजातीची झाडे लावली जाऊ शकतात. रस्त्याच्या कडेला यातील बहुतेक झाडे लावावी. खुल्या जागेत चिंच, वड, पिंपळ, अर्जुन, अमलतास, अंजन, जांभुळ, करंज, कॅशिया आदी प्रजातीची झाडे लावता येतात.
ही विदेशी झाडे लावायची कशाला?
विदेशी झाडांना प्राधान्य दिले जाते. कारण ही झाडे नर्सरीमध्ये सहज उपलब्ध हाेतात व वेगाने त्यांची वाढ हाेते. मात्र ही झाडे टिकाव धरत नाही. रेन ट्री (चिचव्यासारखे बारीक पानांचे), काशिद, साेनमाेहर, गुलमाेहर, विलायती बाभुळ आदी झाडांचा समावेश आहे.
या पावसाळ्यात दाेन डझनच्यावर झाडे पडली
यावर्षी पावसाळ्यात तीन-चार दिवस माेठी वादळे आली. यामध्ये अनेक झाडे उन्मळून पडली. प्रशासनाच्या नाेंदीनुसार यावर्षी दाेन डझनपेक्षा अधिक झाडे वादळाने काेसळली व काहींच्या फांद्या तुटल्या.
झाडांमध्येही देशी-विदेशी हा वाद निरर्थक आहे. वादळात विदेशी झाडेच उन्मळून पडतात असे नाही. वास्तविक आज आपल्याकडे दिसणारी बरीच झाडे कधीकाळी बाहेरून आणली आहेत आणि इकडची तिकडे गेली आहेत. स्थानिक झाडांना प्राधान्य दिले जावे. मात्र विदेशी झाडे नर्सरीमध्ये सहज उपलब्ध हाेतात म्हणून ती अधिक लावली जातात. नर्सरीमध्ये स्थानिक झाडे उपलब्ध करावी म्हणजे लाेक ती झाडेही लावतील. वृक्षाराेपण कार्यक्रमात स्थानिक झाडे लावणे बंधनकारक करावे.
- विजय इलाेरकर, अॅग्राे फाॅरेस्ट्री विभाग, कृषी महाविद्यालय.
- रस्त्याच्या कडेला मुख्यत्वे भरभर वाढणारी विदेशी झाडे लावण्यात येतात. वेगाने वाढत असल्याने मुळे कमजाेर असतात व त्यांच्या फांद्याही तुलनेने कमकुवतच असतात. ही झाडे लवकर वाढतात आणि लवकर तुटतातही. या तुलनेत देसी झाडे माेठ्या वादळातही मजबुतीने उभी राहतात. दुसरे कारण म्हणजे रस्ते दुरुस्ती, नाल्या बांधकाम आदी विकासकामांमुळेही झाडांची मुळे कमजाेर हाेतात व छाेट्या वादळातही उन्मळून पडतात.
- प्राची माहुरकर, वनस्पती अभ्यासक.