वीज बिलाच्या नावावर नागरिकांची लूट : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:14 PM2019-06-20T23:14:12+5:302019-06-20T23:17:09+5:30
महावितरण आणि त्यांची फ्रेन्चाईजी असलेल्या एसएनडीएल कंपनीद्वारे भरमसाट वीज बिल पाठवून नागरिकांची प्रचंड लूट केली जात असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. याबाबत समितीचे संयोजक राम नेवले आणि युवा आघाडीचे विभाग अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी एसएनडीएलचे वाणिज्य विभाग प्रमुख धर्मेंद्र श्रीवास्तव यांना बुधवारी निवेदन सोपविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरण आणि त्यांची फ्रेन्चाईजी असलेल्या एसएनडीएल कंपनीद्वारे भरमसाट वीजबिल पाठवून नागरिकांची प्रचंड लूट केली जात असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. याबाबत समितीचे संयोजक राम नेवले आणि युवा आघाडीचे विभाग अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी एसएनडीएलचे वाणिज्य विभाग प्रमुख धर्मेंद्र श्रीवास्तव यांना बुधवारी निवेदन सोपविले.
मासुरकर यांनी सांगितले की, महावितरण व एसएनडीएलद्वारे विजेच्या बिलात इंधन समायोजन शुल्क, स्थिर आकार, वीज शुल्क व लेट शुल्क आकारले जाते व त्यावर पुन्हा व्याज जोडून बिलासोबत पाठविले जाते. समितीने निवेदनात सादर केलेल्या माहितीनुसार झोपडपट्टीत राहणाऱ्या तमीजा शेख यांना ११४४० रुपये, रमजान अली यांना २११८० रुपये, समिता पांडे यांना ५१२० रुपये, रजनी शुक्ला यांना २२००० तर आशा गडकरी यांना ५९७० रुपये बिल पाठविले आहे. या ग्राहकांना एवढे बिल येऊच शकत नाही, असा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. या बिलांची २५ दिवसात तपासणी करून ते कमी करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा बिल न भरण्याचा इशारा निवेदनात करण्यात आला आहे. पाणी, वीज, कोळसा विदर्भाचाच असताना येथे इतके अधिक बिल कसे, असा सवाल राम नेवले यांनी यावेळी केला. यावेळी अरुण केदार, गणेश शर्मा, रजनी शुक्ला, राजेश बंडे, तमीजा शेख, जितेंद्र बडवे, खुर्शीद बेगम, मनोज बहेकर, नवाब खान, नरेश बोकडे आदी उपस्थित होते.