‘बंटी-बबली’कडून ‘लूट’, ड्रायव्हरवर वार करत ‘कॅब’ लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 12:12 PM2023-07-01T12:12:37+5:302023-07-01T12:17:44+5:30
अज्ञात महिला व पुरुषाविरोधात गुन्हा नोंद
नागपूर : रात्री एका दाम्पत्याला घेऊन जाणे एका कॅबचालकाला खूपच महागात पडले. निर्जन ठिकाणी ‘ड्रॉप’ करण्याचे नाटक करून महिला व पुरुषाने चालकावर कॅबमध्येच शस्त्राने वार केले व त्यानंतर मोबाईल तसेच कार घेऊन पळ काढला. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून जखमी कारचालकावर मेडिकल इस्पितळात उपचार सुरू आहेत.
सूरज मेश्राम (३३, अंतुजीनगर) असे कॅबचालकाचे नाव आहे. मागील दोन महिन्यांपासून ते कॅब चालवत असून त्यांनी भाडेतत्त्वावर परिचयातील एका व्यक्तीकडून कॅब घेतली आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ते टेकडी गणेश मंदिराजवळ कॅबसह उभे असताना ब्लेझर घातलेला तरुण व एक महिला आले आणि त्यांनी बेसा चौकाजवळ जायचे आहे असे सांगितले. सूरज यांनी तीनशे रुपये भाडे होईल असे सांगितल्यावर ते तयार झाले व कॅबमध्ये बसले. डबलडेकर उड्डाणपुलामार्गे सूरजने मनिषनगर व तेथून बेसा असे त्यांना नेले. मात्र ते नेमका पत्ता सांगत नव्हते.
आणखी थोडे समोर, आणखी थोडे समोर असे म्हणत त्यांनी सूरजला निर्जन ठिकाणी कॅब न्यायला लावली. सूरजला संशय आल्याने त्याने घोघली मार्गावर त्यांना भाडे द्या व उतरा असे सांगितले. यावर महिलेने धारदार शस्त्राने सूरजच्या मानेवर वार केले. दुसरा वार करत असताना सूरजने हाताने चाकू अडविला. त्यात ते जखमी झाले. पुरुषाने सूरजला कारच्या बाहेर ओढले व मारहाण करत खाली फेकले. त्यानंतर मोबाईल, दीड ते दोन हजारांची रोख व कार घेऊन दोघांनीही पळ काढला. सूरजने जवळील पोद्दार शाळा गाठली व तेथील सुरक्षारक्षकाच्या मोबाईलवरून पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस पोहोचले व सूरजला मेडिकल इस्पितळात दाखल केले. सूरजच्या तक्रारीवरून अज्ञात महिला व पुरुषाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.