दिवसाढवळ्या साडेआठ लाख लुटले

By admin | Published: October 19, 2016 03:09 AM2016-10-19T03:09:53+5:302016-10-19T03:09:53+5:30

जनावरांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांच्या दुचाकीतील साडेआठ लाखांची रोकड लुटारूंनी लंपास केली.

Looted half a million in the day | दिवसाढवळ्या साडेआठ लाख लुटले

दिवसाढवळ्या साडेआठ लाख लुटले

Next

गजबजलेल्या वस्तीत घटना : ताजनगरात खळबळ
नागपूर : जनावरांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांच्या दुचाकीतील साडेआठ लाखांची रोकड लुटारूंनी लंपास केली. मंगळवारी दुपारी ३.४० च्या सुमारास ताजनगरात ही खळबळजनक घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फय्याज कुरेशी रहेमान कुरेशी (वय ३५) हे ताजनगर टेका नाका परिसरात राहतात. ते कळमना मार्केटमधून जनावरे खरेदी करून औरंगाबादला पाठवितात. या व्यवहाराची रक्कम संबंधितांकडून कुरेशी यांच्या बँक खात्यात जमा होते. मंगळवारी दुपारी सिव्हील लाईनमधील आयडीबीआय बँकेत जमा झालेली रक्कम काढण्यासाठी आले. त्यांनी ८ लाख, ५० हजारांची रोकड काढून ती आपल्या अ‍ॅक्टीव्हाच्या दुचाकीत टाकली अन् ही रोकड घेऊन ते आपल्या अ‍ॅक्टीव्हाने घरी पोहचले. दुपारी ३.४० मिनिटांनी घरासमोर अ‍ॅक्टीव्हा उभी केली असतानाच एका दुचाकीवर दोन आरोपी आले. त्यांनी कुरेशी यांना बकरा मंडीतील एका व्यक्तीचा पत्ता विचारला. कुरेशींना गोष्टीत व्यस्त करून दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अ‍ॅक्टीव्हाच्या डिक्कीचे कुलूप तोडून त्यातील रोकड काढून घेतली अन् हे चारही लुटारू पळून गेले. दुचाकीजवळ येताच लुटारूंनी आपली रोकड पळविल्याचे कुरेशींच्या लक्षात आले. त्यांनी लगेच आरडाओरड करीत आरोपींचा पाठलाग केला. मात्र, सुसाट वेगाने दुचाक्या चालवित दोन्ही वाहनांवरून आरोपी पळून गेले. (प्रतिनिधी)

बँकेपासूनच पाठलाग
जेथे ही घटना घडली तो ताजनगर टेका परिसर अत्यंत गजबजलेला आहे. घटनेच्या वेळीसुद्धा तेथे मोठी गर्दी होती. अशा ठिकाणी अवघ्या दोन-चार मिनिटात आरोपींनी रोकड लुटून नेल्याचे कळाल्याने घटनास्थळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली. माहिती कळाल्यानंतर पाचपावलीचा पोलीस ताफा पोहचला. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून लुटारूंचा मार्ग काढण्याचे प्रयत्न केले. या घटनेनंतर जबर मानसिक हादरा बसलेल्या कुरेशी यांना पोलिसांनी प्रदीर्घ विचारपूस केली. त्यानंतर उपरोक्त आरोपी बँकेपासूनच आपला पाठलाग करीत असल्याचे कुरेशींनी पोलिसांना सांगितले.

Web Title: Looted half a million in the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.