पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाने लुटले

By admin | Published: July 19, 2016 02:58 AM2016-07-19T02:58:18+5:302016-07-19T02:58:18+5:30

विदर्भ व मराठवाडा अविकसित राहण्यामागे सत्तेवर आलेले प्रत्येकच सरकार जबाबदार आहे. सत्तेवर आलेल्यांनी या

Looted by the leadership of western Maharashtra | पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाने लुटले

पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाने लुटले

Next

श्रीपाल सबनीस यांची टीका : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला विरोध
नागपूर : विदर्भ व मराठवाडा अविकसित राहण्यामागे सत्तेवर आलेले प्रत्येकच सरकार जबाबदार आहे. सत्तेवर आलेल्यांनी या दोन्ही प्रदेशांना योग्य न्याय दिला नाही. पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व लुटारू आहे. त्यामुळेच त्यांनी विदर्भ व मराठवाड्यावर कायम अन्याय केल्याची टीका अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आज येथे केली.
वनराई फाऊंडेशनच्यावतीने सोमवारी नागपुरात आयोजित कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर विचार मांडले. सरकारचा इतिहास नेहमीच अन्यायकारक राहिला आहे.
सत्ताधाऱ्यांनी कधीही व्यावहारिक भूमिका घेतली नाही. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही प्रदेशाच्या विकासाचा बॅकलॉग सहजासहजी भरून निघणे शक्य नाही. सध्याचे मुख्यमंत्री विदर्भातील आहेत, मात्र तेही काय करतील हा प्रश्न आहे. त्यांना जाब विचारणारी पिढी निर्माण होणे आवश्यक आहे. केवळ राजकारण्यांना दोष देण्यात अर्थ नाही. समाजही जागृत झाला पाहिजे. त्यामुळे सांस्कृतिक शुद्धीकरणासह राजकारण व समाजाचेही शुद्धीकरण होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
विदर्भावर अन्याय झाला हे सत्य मान्य केले तरी स्वतंत्र राज्य निर्माण करणे हा काही उपाय नाही. राज्याचे तुकडे होणे मान्य नसल्याचे सांगत त्यांनी विदर्भाच्या मागणीला तत्त्वत: विरोध असल्याचे मत व्यक्त केले.
त्यापेक्षा सिंचनाचा अनुशेष दूर करून औद्योगिक विकास साधावा, अशी मागणी त्यांनी केली. या संवाद कार्यक्रमाच्या वेळी वनराई फाऊंडेशनचे अजय पाटील व डॉ. पिनाक दंदे प्रामुख्याने उपस्थित होते.(प्रतिनिधी)

मोदींवरील वक्तव्यावर सारवासारव
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले नेते आहेत. हिंदुत्ववादी विचारातून आले असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी महात्मा गांधी आणि बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा ताकदीने प्रसार केला आहे. दहशतवादाच्या सावटाखाली असलेल्या जगात हे विचार आवश्यक असून या विचाराने ते भारताचे नेतृत्व करीत आहेत. पाकिस्तान भेटीचे वर्णन करताना आपला पंतप्रधान म्हणून मोदींचा एकेरी उल्लेख केल्यामुळेच गैरसमज निर्माण होऊन वाद निर्माण झाल्याचे सांगत या वादावर त्यांनी सारवासारव केली.

नागपुरात व्हावे मराठी भाषेचे विद्यापीठ
मराठी भाषेच्या विद्यापीठाची मागणी नाशिक येथे समोर आली आहे. याबाबत बोलताना, साहित्य व सांस्कृतिक विकास साधण्यासाठी राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सरकारने नागपूर किंवा विदर्भात मराठी विद्यापीठाची स्थापना करून साहित्यिक बॅकलॉग दूर करावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ही मागणी विदर्भाचे मानबिंदू असलेले राम शेवाळकर, डॉ. भावे, दत्तो वामन पोतदार, श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. कोलते यांच्यामार्फत अनेक वर्षांपासून केली जात आहे. विविध विद्यापीठात मराठीचे स्वंतत्र विभाग असले तरी मराठी भाषेची व्यापकता, बहु सांस्कृतिक व बहु धर्मीय असलेली मराठी तसेच आंतरविद्या शाखेचा अभ्यास या विभागात शक्य होत नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रात बेळगावचा सीमाप्रश्न व गोव्यामध्ये मराठीला मिळत असलेल्या दुय्यम दर्जावरही भाष्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकही नोबेल का नाही?
मराठी साहित्याचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे. संत साहित्यापासून फुले, शाहू, आंबेडकरांचे साहित्य तसेच वाङ्मयीन साहित्याची मोठी परंपरा आहे. मात्र आंतरराष्ट्रीय आव्हान मराठीसमोर उभे ठाकले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीशी जुळवून घेण्यात आम्ही अपयशी ठरत आहोत. चार ज्ञानपीठ असलेल्या मराठी साहित्यिकांकडे एकही नोबेल नसणे ही बाब शोभनीय नसल्याचे रोखठोक मत सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: Looted by the leadership of western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.