प्रस्तावित वीज प्रकल्पामुळे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 01:06 AM2019-09-22T01:06:13+5:302019-09-22T01:08:24+5:30
आधीच्या प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढून पर्यावरण व आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असताना नवा औष्णिक प्रकल्प नागपूरकरांच्या जीवावर उठणार, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात आधीच विविध औष्णिक प्रकल्पातून १७,००० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. लोकांची गरज व मागणी नसताना १३२० मेगावॅटचा आणखी एक विद्युत प्रकल्प कोराडी येथे सुरू करण्यात येत आहे. जळणाऱ्या कोळशामुळे अत्यंत धोकादायक सल्फरडाय ऑक्साईड आणि रेडिओअॅक्टीव्ह कणांचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. आधीच्या प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढून पर्यावरण व आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असताना नवा प्रकल्प नागपूरकरांच्या जीवावर उठणार, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.
जनमंचतर्फे जनसंवाद कार्यक्रमांतर्गत शनिवारी बाबुराव धनवटे सभागृहात कोराडीचा प्रस्तावित औष्णिक वीज प्रकल्प नागपूरकरांच्या जीवावर उठणार काय, या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात विदर्भ पर्यावरण कृती समितीचे संयोजक सुधीर पालीवाल आणि महाविदर्भ जनजागरण समितीचे संयोजक नितीन रोंघे यांनी या प्रकल्पामुळे होणाऱ्या धोक्याचे संकेत दिले. जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप व्यासपीठावर उपस्थित होते. पालीवाल म्हणाले, जगात कुठेही नसतील एवढे वीज प्रकल्प नागपूरच्या आसपास आहेत. १० वर्षांपूर्वी हरित लवादाने प्रदूषण नियंत्रणासाठी सिस्टीम लावण्याचे निर्देश देऊनही कोराडीत ते बसविण्यात आले नाही. यामुळे अनेक आजार आणि मृत्यू ओढविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नितीन रोंघे यांनीही प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला. प्रास्ताविक राजीव जगताप यांनी तर संचालन अॅड. मनोहर रडके यांनी केले.