नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीचा घटतोय साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:29 AM2019-02-12T10:29:06+5:302019-02-12T10:31:25+5:30
प्रदूषण व अवैध वाळू उपस्यासह इतर कारणामुळे कन्हान नदीचा जलसाठा कमी झाला आहे. उपयुक्त उपाययोजना करून कन्हान नदीला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे अन्यथा कन्हान नगर परिषदद्वारे साकारण्यात येणारी १८ कोटी ९८ लाखांची जलशुद्धीकरण योजना निकामी होण्याची शक्यता आहे.
धनंजय कापसीकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: प्रदूषण व अवैध वाळू उपस्यासह इतर कारणामुळे कन्हान नदीचा जलसाठा कमी झाला आहे. उपयुक्त उपाययोजना करून कन्हान नदीला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे अन्यथा कन्हान नगर परिषदद्वारे साकारण्यात येणारी १८ कोटी ९८ लाखांची जलशुद्धीकरण योजना निकामी होण्याची शक्यता आहे. कन्हान नदी वैनगंगेला संगम करणाऱ्या प्रमुख सहायक नद्यापैकी एक आहे. नागपूर शहर व लगतच्या गावांना पाणीपुरवठा याच नदीद्वारे केला जातो. परंतु वर्तमानकाळात नदीतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतो आहे. कारण अप्रत्यक्ष पाणीस्रोत असणाऱ्या पेंच प्रकल्पसुद्धा मध्य प्रदेशातील चौराई डॅममुळे कोरडा पडत आहे तर कोच्छी बंधाºयामुळे पाण्याची कमतरता जाणवत आहे. नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या जुनी कामठी येथील कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या बंधाºयामुळे कन्हानलगत असलेली नदीपाण्याच्या शोधात आहे. कन्हान नगराला लागणाऱ्या पाण्याची पूर्तता कशी केली जाईल हा प्रश्न निर्माण होत आहे. जलशुद्धीकरण करण्यासाठी जल उपलब्ध असणे आवश्यक आहे. जर जल उपलब्ध नसेल तर शुद्धीकरण कशाचे केले जाईल हा नेमका प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. अस्वच्छतेमुळे कन्हान नदीचे पाणी दूषित होत असून स्रोतातून येणाऱ्या पाण्यापेक्षा वेकोलि व इतर नाल्यांच्या पाण्याने नदीचे पाणी दूषित होत आहे. जे भविष्यात मोठे आव्हान ठरणार आहे.
पेंच प्रकल्पात फक्त ११ टक्के जलसाठा
पेंच प्रकल्पात तोतलाडोहमध्ये ९ टक्के तर एकूण प्रकल्पात ११ टक्के जलसाठा आहे. ज्यामुळे रबी हंगामाकरिता पाणी सोडण्यात आले नाही. फक्त नागपूरकरिता पाणी देण्यात येत असल्याची माहिती पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तुरखेडे यांनी दिली.
जलशुद्धीकरण केंद्र निकामी ठरण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून कन्हान नदीवर १८ कोटी ९८ लाखाचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. कन्हान येथील जवळपास ३२ हजार लोकांना या केंद्रातून शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. परंतु कन्हान नगराला प्रतिदिन जवळपास ६.४० लाख लिटर पाण्याची गरज आहे. जल शुद्ध करण्याकरिता सुमारे ६०/४० चा अनुपात वापरला गेला तर हे पाणी शुद्ध करण्याकरिता जवळपास १६ लाख लिटर प्रतिदिन पाण्याची आवश्यकता आहे. कन्हान नदीची वर्तमान स्थिती पाहता हे शक्य दिसत नाही.
कन्हान नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपी प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामुळे कन्हान येथील सांडपाणी शुद्ध करून नदीत सोडण्यात येईल. यासोबत केंद्र सरकारद्वारे कन्हान न.प.अंतर्गत येणाऱ्या शिहोरा गावाजवळ मोठा बंधारा निर्माण करण्याची योजना आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न सुटेल.
-शंकर चहांदे, नगराध्यक्ष, कन्हान.