नवीन ई-कॉमर्स पॉलिसीमुळे रिटेल व्यवसायाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:13 AM2021-09-16T04:13:38+5:302021-09-16T04:13:38+5:30
नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन ई-पॉलिसीमुळे देशातील रिटेल बाजाराचे नुकसान होत असून किरकोळ व्यावसायिक संकटात आले आहेत. या पॉलिसीच्या ...
नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन ई-पॉलिसीमुळे देशातील रिटेल बाजाराचे नुकसान होत असून किरकोळ व्यावसायिक संकटात आले आहेत. या पॉलिसीच्या विरोधात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) आवाहानार्थ नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्त्वात चेंबरच्या सिव्हील लाईन्स येथील प्रांगणात व्यापाऱ्यांनी धरणे आंदोलन केले आणि केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध घोषणा दिल्या.
चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, कायदे, नियम आणि एक मजबूत प्रशासकीय व्यवस्था असतानाही मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या कायद्याचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयासह विभिन्न न्यायालयाने मोठ्या कंपन्यांच्या व्यापार मॉड्युलवर ताशेरे ओढले आहेत. त्यानंतरही या कंपन्यांवर ठोस कारवाई झालेली नाही. याउलट सामान्य व्यापारी काही चूक करीत असेल तर प्रशासन त्यांच्याविरुद्ध कारवाई करते. मोठ्या कंपन्यांवर प्रशासन कारवाई का करीत नाही, हा गंभीर प्रश्न आहे.
चेंबरचे माजी अध्यक्ष व कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, विदेशी कंपन्या देशातील ई-कॉमर्स नियम व कायद्याचे पालन करीत नाहीत. या कंपन्या भारतातील ई-कॉमर्स कंपन्यांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावर नियंत्रणासाठी सरकारने ग्राहक कायद्यांतर्गत प्रस्तावित नियमांना त्वरित लागू करावे. व्यापाऱ्यांनी १५ सप्टेंबरपासून महिनाभर ई-कॉमर्सवर ‘हल्ला बोल’ एक राष्ट्रीय अभियानाची सुरुवात केली आहे. या दरम्यान सर्व राजकीय पक्षांना चेंबरतर्फे पत्र पाठविण्यात येणार आहे.
याप्रसंगी अर्जुनदास आहुजा, स्वप्निल अहिरकर, हेमंत गांधी, फारूख अकबानी, संजय के. अग्रवाल, सचिन पुनियानी, शब्बार शाकीर, राजवंतपाल सिंग तुली, मोहन चोईथानी, मनोहरलाल आहुजा, रमन पैगवार, महेश कुकडेजा, ॲड. निखिल अग्रवाल, प्रभाकर देशमुख, सुनील जग्यासी, प्रकाश हेडा, मनोहरलाल आहुजा, किशोर धाराशिवकर, गोविंद पटेल, आनंद भुतडा, विक्रांत भालगोटे, अशोक बियानी, समित जैन, अजय कानतोडे, सुभाष जोबनपुत्रा, रवींद्र हर्दवानी, ज्योती अवस्थी, नितू नायक, पुरूषोत्तम जैन आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.