‘शेड्युल’ ठरत नसल्यामुळे एसटीला तोटा; बसेस तयार पण मागणी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 11:59 AM2021-03-18T11:59:28+5:302021-03-18T11:59:50+5:30
Nagpur News लॉकडाऊनमध्ये बसेसच्या वाहतुकीवर बंदी नाही. परंतु प्रवासीच मिळत नसल्यामुळे ५० टक्के बसेस आगारातच उभ्या राहत आहेत. बदललेल्या निर्देशामुळे एसटी बसेसचे नियोजन होत नसल्यामुळे एसटीला तोटा होत आहे.
वसीम कुरेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील वर्षी दीर्घकाळ लॉकडाऊनचा सामना केल्यानंतर नव्या वर्षातही पुन्हा मार्च महिन्यात एसटीला तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये बसेसच्या वाहतुकीवर बंदी नाही. परंतु प्रवासीच मिळत नसल्यामुळे ५० टक्के बसेस आगारातच उभ्या राहत आहेत. बदललेल्या निर्देशामुळे एसटी बसेसचे नियोजन होत नसल्यामुळे एसटीला तोटा होत आहे.
दुसऱ्यांदा लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागात ४०० पैकी २२० बसेस धावत आहेत. एकूण १.४० लाख किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यानंतर एसटीला ४२ लाखाचे उत्पन्न मिळत होते. परंतु आता २२० बसेस धावत असल्यामुळे एसटीच्या बसेस केवळ ८० हजार किलोमीटर धावत आहेत. त्यामुळे ४२ लाखाचे उत्पन्न १७ ते १८ लाखावर आले आहे. डिझेलचे दरही वाढले असून पासधारकांची संख्या कमी झाली आहे. एका बसमध्ये २२ प्रवासी बसविल्यामुळे तोटा होतो. भाजीपाला विकणाऱ्यांसह लहान व्यवसाय करणारे लॉकडाऊनमध्ये प्रवास करीत नाहीत. अशा अनेक कारणांमुळे ऐनवेळी एसटीचे शेड्युल रद्द करण्यात येत आहे.
रद्द कराव्या लागत आहे फेऱ्या
‘आगारात एसटीच्या बसेस तयार ठेवण्यात येत आहेत. परंतु प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. कोणत्या मार्गावर किती प्रवासी मिळतील, हे ठरत नाही. प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे काही फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत.’
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
.............