कोरोना संसर्गाच्या काळात ट्रान्सपोर्ट व्यवसाय तोट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:07 AM2021-05-26T04:07:35+5:302021-05-26T04:07:35+5:30
नागपूर : दीड वर्षांत कोरोना संसर्गाच्या काळात ट्रान्सपोर्ट व्यवसाय तोट्यात आला आहे. त्यातच इंधनाचे भाव आकाशाला भिडल्याने ट्रक रस्त्यावर ...
नागपूर : दीड वर्षांत कोरोना संसर्गाच्या काळात ट्रान्सपोर्ट व्यवसाय तोट्यात आला आहे. त्यातच इंधनाचे भाव आकाशाला भिडल्याने ट्रक रस्त्यावर धावणे कठीण झाले आहे, सरकारने डिझेलचे भाव कमी करावेत आणि ट्रान्सपोर्टला आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी नागपूर ट्रेलर ओनर्स युनियनचे अध्यक्ष शैलेंद्र मिश्रा यांनी पत्रकारपरिषदेत केली.
मिश्रा म्हणाले, कोरोना काळात देशाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला आता मात्र घरघर लागलेली आहे. सध्याची परिस्थिती या व्यवसायाला मारक असल्याचे दिसून येत आहे. इंधनाचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातच वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या मनमानी कारभारामुळे त्रासात आणखी भर पडली आहे. सोबतच जागोजागी ई-चालनाच्या पाठविण्याची जणू शर्यतच लागली आहे. हातात कामच नसल्याने कमी किरायाने अर्थात तोट्यात काम करावे लागत आहे. गाड्यांचे हप्ते थकल्याने गाड्या सील करण्यात येत आहेत. या सर्व प्रकारामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसाय मोडकळीस आला आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आर्थिक आणि मानसिकतेतून पूर्णपणे खचला आहे.
देशात ट्रान्सपोर्ट व्यवसाय असा आहे की, सुरुवातीला कर भरून व्यवसाय केला जातो. त्यानंतरही या व्यवसायाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. केंद्र आणि राज्य सरकार गेल्यावर्षीपासून अनेक व्यवसायाला आर्थिक मदत करीत आहे. अशा संकटकाळात या क्षेत्राला कर, विमा, टोल आणि बॉर्डर करात शिथिलता देण्यात यावी. त्यानंतरच या क्षेत्राला थोडेफार चांगले दिवस येतील, असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.