४.६५ कोटीसाठी २.१५ लाख गमावले
By admin | Published: September 3, 2015 02:51 AM2015-09-03T02:51:03+5:302015-09-03T02:51:03+5:30
दिल्लीतील सायबर गुन्हेगारांच्या टोळीने एका खासगी सुरक्षा कंपनीच्या अधिकाऱ्याला ४.६५ कोटी रुपयांची लॉटरी लागल्याची बतावणी करून ....
दिल्लीतील टोळीचे कृत्य : अधिकारी बनला शिकार
नागपूर : दिल्लीतील सायबर गुन्हेगारांच्या टोळीने एका खासगी सुरक्षा कंपनीच्या अधिकाऱ्याला ४.६५ कोटी रुपयांची लॉटरी लागल्याची बतावणी करून त्याला २.१५ लाख रुपयांचा फटका दिला आहे. हे प्रकरण वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले.
वाडीतील आठवा मैल परिसरातील रहिवासी आलोक कुमार एका खासगी सुरक्षा कंपनीत अधिकारी म्हणून कामास आहेत. त्यांना २ आॅगस्टला मोबाईलवर एका झाकजी मोबाईल कंपनीच्या लकी ड्रॉमध्ये ४.६५ कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचा एसएमएस आला. एसएमएसमध्ये त्यांना ई-मेल आणि बँक खात्याची माहिती पाठविण्यास सांगितले. ही माहिती पाठविल्यानंतर पुन्हा ई-मेल वर मॅसेज येईल, असे त्यांना सांगण्यात आले. कथित जॉन मार्टिनने आपण खासगी मोबाईल कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून बक्षिसाची रक्कम मिळविण्यासाठी आलोक यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यांना तीन ते चार वेगवेगळ्या बँकेचे अकाऊंट नंबर देऊन पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर मोबाईल कंपनीचा अधिकारी बक्षिसाची रक्कम घेऊन दिल्ली विमानतळावर पोहोचल्याचे सांगून मनी एक्स्चेंजची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शुल्क जमा करावयाचे असल्यामुळे त्यांना पुन्हा बँकेत पैसे भरण्यास सांगण्यात आले. ही रक्कम भरल्यानंतर बँकेत बक्षिसाची रक्कम जमा होईल, असे सांगितले. ही रक्कम भरूनही बँकेत पैसे जमा न झाल्यामुळे आलोक यांना शंका आली. त्यांनी मार्टिन आणि त्यांची सहकारी नेहा शर्मा यांना पैसे परत करण्यास सांगितले.
त्यावर त्यांनी पैसे परत करण्यासाठी ४० हजार रुपये बँकेत जमा करण्यास सांगितले. ही रक्कमही आलोक यांनी बँक खात्यात भरली. त्यानंतर आरोपींनी आलोकपासून संपर्क तोडला. (प्रतिनिधी)