‘सोशल मीडिया’ने विवाहित महिला पोहोचली कुटुंबीयांपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 04:26 PM2018-05-18T16:26:02+5:302018-05-18T16:26:02+5:30
कोल्हापुरातील घरापासून दुरावलेल्या महिलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुखरूप घरी पोहचविल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील पाटनसावंगी येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोल्हापुरातील घरापासून दुरावलेल्या महिलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुखरूप घरी पोहचविल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील पाटनसावंगी येथे घडली. मध्यरात्रीनंतर साधारणत: १ वाजताच्या सुमारास एकटी महिला पायी जात असल्याचे लक्षात येताच एका तरुणाने सामाजिक कार्यकर्त्याला ही बाब सांगितली. त्यामुळे त्याने तडक घटनास्थळ गाठले. त्या महिलेची विचारपूस करीत सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा ‘लाईव्ह व्हिडिओ’ केला. पाहतापाहता त्यावर अनेकांचे संदेश आले आणि ती महिला एकाच्या ओळखीची निघाली. त्याने ही बाब सदर महिलेच्या कुटुंबापर्यंत पोहोचविली. त्यांनीही लगेच पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सदर महिलेला कुटुंबाच्या सुपूर्द केले. एखाद्या चित्रपटातील कथानक वाटावे, अशी ही घटना आहे. ही घटना पाटणसावंगी येथे बुधवारी (दि. १६)मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गुरुवारी (दि. १७) तिला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले.
छाया यशवंत कांबळे (३८, रा. नवीन वसाहत औखाड, जि. कोल्हापूर) असे सदर महिलेचे नाव आहे. कौटुंबिक कारणामुळे छाया ही कोल्हापुरातून तडक नागपुरात पोहोचली. नागपुरातून पुढे ती दहेगाव (रंगारी)पर्यंत गेली. मात्र तिच्याकडील पैसे संपले. आता पुढचा प्रवास कसा करावा, थांबावे कुठे असा प्रश्न तिला पडला. त्यामुळे ती दहेगावपासून चालत राहिली. मध्यरात्रीनंतर साधारणत: १ वाजताच्या सुमारास ती हितेश नंदकुमार बन्सोड, रा. सावनेर याच्या फेसबुक मित्राला ती पाटणसावंगीच्या वाकी जोडरस्त्यावर दिसली. हितेश हा मनोरुग्ण व निराधारांचा आधारवड म्हणून काम करतो. त्यामुळे त्याला ही माहिती मिळताच त्याने थेट पाटणसावंगी गाठले. मित्राने सांगितलेल्या वर्णनानुसार तो छायापर्यंत पोहोचला. तिची विचारपूस केली असता तिने छाया हे नाव सांगत सांगलीला माहेर असल्याचे सांगितले. त्यामुळे हितेशने क्षणाचाही विलंब न लावता ‘फेसबुक लाईव्ह’ केले. दरम्यान मुस्ताफा विनोद पाटील, शैलेश शिंदे यांनी सदर महिलेला ओळखत असल्याचे सांगितले. तर मुस्तफा मुजावर याने छायाच्या कुटुंबीयांना ही बाब सांगितली. त्याने पूर्ण माहिती घेऊन छाया ही नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगीपर्यंत पोहोचली असल्याचेही सांगितले. त्याने मोबाईल क्रमांक सांगून छायाच्या कुटुंबीयांशी हितेशचे बोलणेही करून दिले. ‘छायाची काळजी घ्या, आम्ही येतोच’ असे तिच्या कुटुंबीयांनी विनवणी केली. त्यानुसार गुरुवारी तिचा पती यशवंत वसंत कांबळे, आई शेवंता, जाऊ राणी कांबळे हे सर्व सावनेर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर छायाला त्यांच्या सुपूर्द केले.
निराधारांचा आधारवड
सावनेर परिसरात निराधार, मनोरुग्णांचा आधारवड म्हणून हितेश बन्सोड या तरुणाकडे बघितले जाते. आतापर्यंत त्याने २५ पेक्षा जास्त मनोरुग्णांची सेवा केली. त्यांची अंघोळ, दाढी आदी कामांसोबतच चांगले कपडे, जेवण देऊन तो त्यांना नागपुरातील मनोरुग्णालयात तर निराधारांना वृद्धांना वृद्धाश्रमात दाखल करतो. आतातर सावनेर परिसरात कुणीही अनोळखी, भटकंती करणारी व्यक्ती दिसल्यास हितेशचीच आधी आठवण केली जाते. पाटणसावंगी येथे आढळलेली छायाच्या बाबतीतही असेच काहीसे झाले. निराधारांच्या मदतीला धावतो ही बाब त्याच्या फेसबुक मित्रांना माहीत आहे. सदर महिला पाटणसावंगीत दिसताच त्याचे फेसबुक मित्र केदार आंबोलकर, गौरव कोल्हटकर यांनी हितेशला सांगितले. त्यामुळेच ती महिला सुखरुप तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचू शकली. या कामात सावनेर पोलिसांनीही सहकार्य केले.