धुक्यात हरवली वाट; १९ दिवस बंद राहणार काही उड्डाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 10:10 AM2019-11-04T10:10:54+5:302019-11-04T10:12:55+5:30
गो एअरची दोन विमाने सिस्टिममधून काढून टाकण्यात आली आहेत. ११ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईल बुकिंग करणाऱ्यांना ही विमाने रद्द असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारी दिल्ली येथे दाट धुके असल्यामुळे विमानांच्या हवाई वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. दिल्ली येथून उड्डाण केलेली विमाने देशाच्या विविध भागात उशिरा पोहोचली. यामध्ये नागपुरातील तीन विमानांचा समावेश आहे.
दिल्ली येथून नागपुरात उशिरा पोहोचणाऱ्या विमानांमध्ये इंडिगो एअरलाईन्सचे ६ई १३५ दिल्ली-नागपूर विमान २.२० मिनिटे उशिरा अर्थात निर्धारित वेळ दुपारी १२ ऐवजी २.२० वाजता पोहोचले. ६ई-२०१७ दिल्ली-नागपूर विमान जवळपास अर्धा तास विलंबाने सकाळी ९.०७ वाजता उतरले. याशिवाय गो एअरचे २५१९ दिल्ली-नागपूर विमान १.४५ मिनिटे उशिरा रात्री ८.२० ऐवजी १०.४० वाजता आले. इंडिगोचे ६ई ५३२५ मुंबई-नागपूर विमान अर्धा तास विलंबाने सकाळी १०.२९ वाजता पोहोचले. याशिवाय एअर इंडियाचे एआय-६२९ मुंबई-नागपूर विमान एक तास विलंबाने रात्री जवळपास ९.३० वाजता आले. दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये रविवारला वायू प्रदूषण वाढल्याने जास्त धुके दाटले होते. माहितीनुसार धुक्याची दृश्यता अत्यंत कमी झाली होती. धुक्यामुळे दृश्यतेवर अधिक परिणाम झाला. दिल्लीत अशाप्रकारे धुके नेहमीच दाटत असल्यामुळे चिंतेचा विषय झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान कंपन्यासुद्धा आता विमानाच्या वेळेच्या संदर्भात विचार करीत आहे. रविवारी धुक्यामुळे दिल्लीला येणाºया ३७ विमानांना इतरत्र वळविण्यात आले.
१९ दिवस बंद राहणार उड्डाण!
गो एअरची दोन विमाने सिस्टिममधून काढून टाकण्यात आली आहेत. ११ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईल बुकिंग करणाऱ्यांना ही विमाने रद्द असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जी८-२५१५ दिल्ली-नागपूर विमान (उड्डाण सकाळी ६.५५ वाजता) आणि जी८-२५१६ नागपूर-दिल्ली (उड्डाण सकळी ९.०५ वाजता) या विमानांचा समावेश आहे. एअरलाईन्स सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विमाने रद्द करण्यामागे कंपनीला नागपूर कार्यालयाला अजूनही स्पष्टीकरण पाठविले नाही. पण सिस्टिमवर ‘ऑपरेशनल रिझन’ एवढेच दिसून येत आहे. जास्त प्रवासी मिळविण्याच्या काळात अर्थात ‘विंटर सीझन’मध्ये विमाने रद्द करण्याचे कारण का असावे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कंपनीला दिल्ली मार्गावर १९ दिवसांसाठी उड्डाण रद्द करावे लागले
आहे.
रायपूरला धुके, विमान नागपुरात वळविले
एअर इंडियाच्या दिल्ली-रायपूर विमानाला धुक्याचा सामना करावा लागला. धुक्यामुळे विमान रायपूरला उतरू शकले नाही. अखेर नागपूरला वळवून उतरविण्यात आले. एअर इंडियाचे एआय ४७७ दिल्ली-रायपूर विमान रविवारी पहाटे ५.२५ वाजता दिल्लीहून रवाना झाले. सकाळी ७.३० च्या सुमारास रायपूर येथे पोहोचल्यानंतर दृश्यता कमी असल्यामुळे एटीसीकडून उतरण्यासाठी हिरवी झेंडी मिळाली नाही. त्यानंतर वैमानिकांने नागपूरच्या हवाई नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधून विमान उतरण्याची परवानगी मागितली. अखेर हे विमान (एअरबस ३१९) नागपुरात सकाळी ८.२५ वाजता उतरले. नागपुरात एक तास थांबल्यानंतर सकाळी ९.२० वाजता पुन्हा रायपूरकडे रवाना झाले. प्राप्त माहितीनुसार रायपूर येथे सकाळी ९.३० पर्यंत येणारी सर्व विमाने उशिरा पोहोचली आणि धुक्यामुळे काही विमानांना इतरत्र वळवावे लागले.