अर्थसंकल्पात हरवला वचननामा
By admin | Published: June 20, 2017 01:47 AM2017-06-20T01:47:12+5:302017-06-20T01:47:12+5:30
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ब्रीदवाक्यानुसार लक्ष्य अंत्योदय, प्रण अंत्योदय व पथ अंत्योदय, अर्थात समाजातील शेवटच्या घटकापर्यत विकासाचा लाभ मिळावा, ...
निवडणुकीतील आश्वासनांचा विसर : जुन्याच योजनांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ब्रीदवाक्यानुसार लक्ष्य अंत्योदय, प्रण अंत्योदय व पथ अंत्योदय, अर्थात समाजातील शेवटच्या घटकापर्यत विकासाचा लाभ मिळावा, या हेतूने महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केल्याचा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी केला आहे. परंतु महापालिका निवडणुकीतील वचननाम्याचा भाजपाला विसर पडला आहे. यामुळे अर्थसंकल्पात वचननामा हरवल्याची नागरिकांत चर्चा आहे.
सर्वच योजना एका वर्षात कार्यान्वित करणे शक्य नाही. काही योजनांना चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. याचा विचार करता वचननाम्यातील योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने नियोजन करून त्याचा अर्थसंकल्पात समावेश अपेक्षित होता. तरच त्या पुढील चार ते पाच वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवता आली असती. परंतु आता पहिल्या वर्षात या योजनांना सुरुवात होण्याची शक्यता नाही.
स्वच्छ व सुंदर शहर करण्याचे वचन दिले होते. परंतु स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहराचा क्रमांक २७ व्या क्रमांकावरून १२७ व्या क्रमांकावर गेला.
शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सफाई कर्मचारी नाही. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. शहरातील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु अद्याप शहरातील सर्व भागातील नागरिकांना समान पाणी वितरण करणे शक्य झालेले नाही. उलट टँकरची संख्या वाढलेली आहे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदीची गरज होती.
खासगी बसेसमुळे शहरातील नागरिकांना होणारा त्रास विचारात घेता या बसेसचे पार्किंग शहराबाहेर स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. बहुजन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या थोर पुरुषांच्या नावावर नवीन योजना सुरू करणे, शहरात जलतरण तलावांची निर्मिती करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी तरतूद नाही. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच उच्च शिक्षणासाठी गरीब मुलांना दत्तक घेण्याची ग्वाही दिली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम श्राफल्य योजनेंतर्गत २५ वर्ष सेवा झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घर दिले जाते. या योजनेचा गरजूंना लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु यासाठी तरतूद करण्यात आलेली नाही.
कम्युनिटी आरोग्य केंद्राचा विसर
शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यानुसार शहारातील स्लम भागातील गरीब लोकांना उपचार मिळावे, यासाठी ५० हजार लोकसंख्येमागे एक कम्युनिटी आरोग्य केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १६ कें द्र सुरू होणे अपेक्षित होते. मात्र यासाठी तरतूद करण्यात आलेली नाही.
वृद्धांना शास्ती माफी नाही
८० वर्षांवरील वृद्ध नागरिकांना थकीत पाणी व मालमत्ता कराच्या शास्तीत सूट देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच ७० वर्षांवरील नागरिकांना यात २० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आलेली होती. परंतु या आश्वासनाचा विसर पडला आहे. तसेच इतरही अनेक योजनांसाठी तरतूद करण्यात आलेली नाही. जुन्या योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.