अमेरिकेवरून आलेल्या फेक कॉलमुळे गमावले ३ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 11:08 PM2021-05-26T23:08:43+5:302021-05-26T23:09:20+5:30

Fake call cheated, crime news अमेरिकेवरून आलेल्या फेक कॉलवर विश्वास ठेवल्यामुळे सेवानिवृत्त बँक व्यवस्थापकाला ३ लाख रुपये गमावण्याची वेळ आली. ही घटना बजाजनगर ठाण्यांतर्गत घडली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Lost Rs 3 lakh due to fake call from US | अमेरिकेवरून आलेल्या फेक कॉलमुळे गमावले ३ लाख रुपये

अमेरिकेवरून आलेल्या फेक कॉलमुळे गमावले ३ लाख रुपये

googlenewsNext
ठळक मुद्देसेवानिवृत्त बँक व्यवस्थापकाची फसवणूक : बजाजनगर ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अमेरिकेवरून आलेल्या फेक कॉलवर विश्वास ठेवल्यामुळे सेवानिवृत्त बँक व्यवस्थापकाला ३ लाख रुपये गमावण्याची वेळ आली. ही घटना बजाजनगर ठाण्यांतर्गत घडली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

माधवनगर दक्षिण अंबाझरी मार्ग येथील रहिवासी श्रीकृष्ण मूर्ती सदाशिवम (६५) हे बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाले आहेत. सदाशिवम यांचे मित्र श्रीधर अय्यर अमेरिकेत राहतात. २४ मे रोजी सदाशिवम यांना व्हॉट्सॲप क्रमांकावरून फोन आला. सदाशिवम यांच्याशी बोलणे झाल्यानंतर कॉल बंद झाला. सदाशिवम यांनी व्हॉट्सॲप क्रमांकाची तपासणी केली असता प्रोफाईलवर श्रीधर अय्यर यांचा फोटो होता. फोटो आणि मोबाईल क्रमांक पाहून सदाशिवम यांना अय्यरने अमेरिकेवरून फोन केला असे वाटले. त्यानंतर सदाशिवम यांना त्या क्रमांकावरून मॅसेज आला. मॅसेज करणाऱ्याने स्वत:ला अय्यर असल्याचे सांगून सदाशिवमला भारतात एक महत्त्वाचे काम असून, त्यासाठी तुमची मदत हवी असल्याचे सांगितले. त्याने सदाशिवम यांना ३ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले. सदाशिवम यांनी आपल्या खात्यातून २४ तासात एक लाख ट्रान्सफर करण्याची मर्यादा असल्याचे सांगून ३ लाख ट्रान्सफर करण्यास असमर्थता दाखविली. त्यांनी २४ मे रोजी १ लाख ट्रान्सफर केले. रात्री १२ नंतर नवी तारीख लागल्यामुळे सदाशिवम यांनी मध्यरात्रीनंतर कथित अय्यरच्या खात्यात आणखी २ लाख रुपये ट्रान्सफर केले. ३ लाख रुपये दिल्यानंतर सदाशिवम यांनी अय्यरला त्यांच्या मूळ क्रमांकावर फोन करून पैसे पाठविल्याची माहिती दिली. अय्यरने सदाशिवम यांना फोन किंवा मॅसेज करून पैसे मागितल्याचा इन्कार केला. त्यानंतर सदाशिवम यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी बजाजनगर ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासानंतर फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. सदाशिवम यांना इंटरनेटवरून कॉल केल्याची शंका आहे.

Web Title: Lost Rs 3 lakh due to fake call from US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.