एक लाख डॉलरसाठी गमावले ४० लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:06 AM2021-07-12T04:06:25+5:302021-07-12T04:06:25+5:30
नागपूर : अमेरिकेवरून एक लाख डॉलर भेट म्हणून पाठविण्याची बतावणी करून एका व्यक्तीची ४०.६४ लाखाने फसवणूक केल्याची घटना उघडकीस ...
नागपूर : अमेरिकेवरून एक लाख डॉलर भेट म्हणून पाठविण्याची बतावणी करून एका व्यक्तीची ४०.६४ लाखाने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. बेलतरोडी पोलिसांनी कथित महिलेसह १६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सुचिता दास, ऑस्टीन व्हाईट न्यू जर्सी (अमेरिका), महिमा शर्मा, प्रसतो अधिकारी, नदिम खान, शंकर कुमार द्विवेदी, भोलानाथ, अजय शाह, ओमपाल सिंह, सुशिल नागर, फिरदौस, अजय कुमार, विक्रम सैनी, ताराचंद लुहार आणि जॉर्ज अपोलिनरी रा. दिल्ली अशी आरोपींची नावे आहेत. सुनील देऊळवार (४५) हे वीज विभागात कार्यरत आहेत. त्यांचा लहान भाऊ सुशील अविवाहित आहे. सुनीलने सुशीलसाठी वधू शोधण्यासाठी ऑक्टोबर २०१९ मध्ये भारत मॅट्रिमोनी वेबसाईटवर अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवर न्यू जर्सी अमेरिका येथील कथित सुचिता दासने संपर्क साधला. हे अकाऊंट सुनील संचालित करतात. कथित सुचिताने सुनीलसोबत चॅटिंग केली. तिने सुशीलसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तिने आपले कुटुंबीय धनाढ्य असून लग्नात कोणतीही भेटवस्तू घेण्यास नकार दिला. त्यामुळे सुनील सुचिताच्या चॅटिंगने प्रभावित झाले. तिने सुनीलला आपल्यासाठी पूजा करण्यास सांगितले. तिने सुनीलला एक लाख डॉलर कुरियरने भेट देण्याची बतावणी केली. तिने कुरियरने डॉलर पाठविण्यापूर्वी कथित डॉलरचा फोटो सुनीलला पाठविल्यामुळे सुनीलचा तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर दिल्लीवरून कथित कस्टम अधिकारी तथा महिमा शर्मा नावाच्या महिलेसह अनेकांचे फोन येऊ लागले. त्यांनी सुनीलला तुमचे पार्सल दिल्लीला पोहोचल्याचे सांगितले. पार्सल सोडविण्यासाठी त्यांनी सुनीलला कस्टम ड्युटी द्यावी लागणार असल्याचे सांगितले. तसे न केल्यास त्यांना दंड भरावा लागणार असून पोलीस कारवाईही होऊ शकते अशी धमकी दिली. एक लाख डॉलरची किंमत भारतात ७५ लाख रुपये होते. त्यामुळे सुनीलने कथित कस्टम ड्युटी देण्याची तयारी दर्शवली. त्यांनी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे खात्यात पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर दोन वेगवेगळ्या नावाने आणि क्रमांकाने सुनीलला फोन करून वेगवेगळे शुल्क जमा करण्यासाठी दबाव टाकू लागले. तसे न केल्यास तुरुंगात जावे लागेल, अशी धमकी दिली. त्यामुळे सुनीलने एनईएफटी, आरटीजीएस तसेच युपीआयच्या माध्यमातून ४०.६४ लाख रुपये आरोपींना पाठविले. सुनील वीज विभागात ऑपरेटर आहेत. त्यांनी वडिलोपार्जित संपत्तीतून मिळालेली रक्कम आरोपींना पाठविली होती. त्यांनी आणखी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. याबाबत सुनीलने पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणूक, आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
...............
आरबीआयच्या नावाने फसवणूक
सुनील देऊळवार यांची फसवणूक करण्यासाठी आरोपींनी आरबीआयच्या नावाने पैसे जमा करण्याचा बनावट ई-मेल पाठविला. या ई-मेलमुळे सुनीलला शुल्क शासनाकडे जमा झाल्याचा भरवसा पटला. आरोपींनी सातत्याने पैसे मागितल्यामुळे सुनीलने चौकशी केली असता त्यांना आरबीआयने हा ई-मेल पाठविला नसल्याची माहिती मिळाली. सायबर गुन्हेगारांनी अनेकदा या पद्धतीने फसवणूक केली आहे. वेळोवेळी अशा घटना घडूनही नागरिक आरोपींच्या जाळ्यात सापडतात.
..........