समाजाला जोडणारा शायर हरविला
By Admin | Published: February 9, 2016 02:44 AM2016-02-09T02:44:13+5:302016-02-09T02:44:13+5:30
आपल्या सहजसुंदर रचनांनी हिंदी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शायर निदा फाजली यांचे सोमवारी निधन झाले.
निदा फाजली यांच्या निधनाने साहित्य जगतात शोक
नागपूर : आपल्या सहजसुंदर रचनांनी हिंदी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शायर निदा फाजली यांचे सोमवारी निधन झाले. आपल्या सुंदर रचनांनी समाजाला जोडणारा दुवा हरविला आहे. उपराजधानीच्या हिंदी, उर्दू साहित्यकारांनी निदांसोबत घालविलेल्या क्षणांना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
उर्दू साहित्यात हिंदीला ओळख दिली
निदा फाजली यांच्या निधनाने उर्दू भाषिकांमध्ये हिंदीला ओळख मिळवून देणारा साहित्यकार हरपला आहे. त्यांनी हिंदी साहित्यात महत्त्वपूर्ण संशोधन केले आणि दोह्यांची सहज हिंदीमध्ये रचना करून लोकप्रिय केले. त्यांच्यातील विनम्रता प्रत्येकाला आपलसं करणारी होती.
-प्रा. मधुप पांडेय, साहित्यकार
नागपूरला घेतले होते घर
१९६८ पासून निदा फाजली यांच्यशी मित्रता जुळली. आपल्याशी असलेल्या मित्रत्वामुळे निदा यांनी छावणी येथील गझल अपार्टमेंटमध्ये त्यांच्या व पत्नी मालती जोशी यांच्या नावाने एक घर खरेदी केले. मात्र नंतर ते घर विकले. निदा यांच्या निधनाने उर्दू शायरीच नाही तर देशाचे मोठे नुकसान झाले आहे.
-जफर कलीम, ज्येष्ठ उर्दू शायर
मानवतेला जिवंत ठेवणारा शायर
कबिरानंतर दोह्यांना पुन्हा जिवंत करून निदा यांनी समाजातील ज्वलंत मुद्यांना खरेपणाने सडेतोडपणे समाजासमोर मांडले. आपल्या शायरीने त्यांनी मानवतेला जिवंत ठेवले होते. आम्ही आज आमच्या मार्गदर्शकाला मुकलो आहोत.
- डॉ. सागर खादीवाला
‘गया तो टुटकर रोया’
निदा फाजली यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले आहे. त्यांचे दोहे समाजातील ज्वलंत मुद्यांनाही आरसा दाखविणारे होते. निदा साहेबांना श्रद्धांजली अर्पण करताना ‘बिछडकर फुटकर रोया-गया तो टुटकर रोया’ एवढेच म्हणावेसे वाटते.
-मधु गुप्ता
लहानपणापासून जोडल्या गेलो
वडिलांसोबत निदा यांची अतुट मैत्री होती. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्याशी जोडल्या गेलो. त्यांच्या शायरीत मातीचा गंध होता. बाबा ताजुद्दीन यांच्या सालाना उर्समध्येही ते अनेकवेळा सहभागी व्हायचे.
- समीर कबीर, उर्दू शायर
धर्मांना जोडणारे व्यक्तिमत्त्व
फाजली यांच्या निधनाने उर्दू साहित्याचे नुकसान झाले. त्यांनी नेहमी समाजाला जोडण्याचे काम केले. त्यांच्या शायरीत अलीसोबतच राधा आणि कृष्णाची प्रतिमाही निर्माण होत होती.
-लोकेंद्र सिंह, शायर
दोह्यांमध्ये दु:खाचे वर्णन
निदा यांच्या दोह्यांमध्ये समाजाच्या दु:खाचा सार वर्णन केला होता. ते केवळ उत्कृष्ट शायरच नव्हते तर साधे सरळ व्यवहार करणारे माणूस होते.
-नरेंद्र सतीजा, अध्यक्ष,
जगजितसिंह मंच
शायरीमध्ये होती गंगाजमुनी तहजीब
मुंबई येथे निदा यांच्याशी झालेली भेट एक अविस्मरणीय क्षणासारखी मनात कायम आहे. दोह्यांना पुनरुज्जीवित करून सामाजिक मुद्यांना समाजापर्यंत पोहचविले. त्यांच्या शायरीत राष्ट्रीय एकतेचे सार दिसून येते. त्यांच्या शायरीत असलेली गंगाजमुनी तहजीब सहज जाणवत होती.
-निसार खान