‘राशी-कवच’ची धमाल
By admin | Published: June 14, 2016 02:37 AM2016-06-14T02:37:04+5:302016-06-14T02:37:04+5:30
व्यक्तींच्या राशीमुळे त्यांच्यात आलेले गुणधर्म, स्वभाव वैशिष्ट्य आणि त्यामुळे होणाऱ्या विविध गमतीजमती, यावर
कलर्स व लोकमत सखी मंचचे आयोजन : १२ राशींच्या प्रभावांचे मनोरंजक विश्लेषण
नागपूर : व्यक्तींच्या राशीमुळे त्यांच्यात आलेले गुणधर्म, स्वभाव वैशिष्ट्य आणि त्यामुळे होणाऱ्या विविध गमतीजमती, यावर आधारित ज्योतिषाचार्य अरविंद पांडे आणि नाट्य दिग्दर्शक संजय पेंडसे यांच्या ‘राशी-कवच’ कार्यक्रमाने शनिवारी धमाल उडवली. कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंचच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याभोवती आपले आयुष्य फिरत असते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तिन्ही काळांचा विचार करून पावले टाकत असतो.
काल केलेल्या चुका आज करायच्या नाही आणि पुढेसुद्धा होऊ द्यायच्या नाहीत, असे ठरविणारी प्रत्येक व्यक्ती तिन्ही काळांचा विचार करीत असते. पण हा विचार करीत असताना नेमका राशींचा प्रभाव त्याच्या जीवनावर कसा आणि केव्हा होतो, मनुष्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, त्याचा व्यवसाय, प्रगती, नोकरी, यश या सर्व गोष्टींवर त्याच्या कर्तृत्वाबरोबर त्याच्या नशिबाचा आणि राशींचा कसा प्रभाव पडतो, हेच नेमके या कार्यक्रमातून सांगण्यात आले.
वेगळा विषय, वेगळी कथा, वेगळा बाज अशी या कार्यक्रमाची प्रस्तुती राहिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राशींच्या गमतीजमती सांगताना १२ राशींच्या व्यक्तीला व्यासपीठावर बोलावले. त्यांच्या स्वभावाचे विश्लेषण केले.
शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन अलंकार ज्वेलर्सचे संचालक अशोक शहा, प्रसिद्ध ज्योतिषाचार्य अरविंद पांडे आणि प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक संजय पेंडसे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले.
दरम्यान, कलर्सच्यावतीने प्रथमेश पालकर आणि प्रियंका पाटील या कलावंतांनी ‘राशी-कवच’ या मालिकेतील एक प्रसंग सादर केला. याला सखींनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला.
संचालन नेहा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)