नागपूरकरांनो ‘थर्टीफर्स्ट’ला रात्री १२ वाजेपर्यंतच वाजवा ‘लाऊडस्पीकर’; पार्ट्यांवर वॉच, नाक्यानाक्यावर पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 01:18 PM2022-12-31T13:18:29+5:302022-12-31T13:23:54+5:30

३३ ठिकाणी नाकाबंदी; 'ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह' तपासणीसाठी भरारीपथके

'Loudspeaker' allowed only till 12 pm on 31st eve; Blockade at 33 places in Nagpur | नागपूरकरांनो ‘थर्टीफर्स्ट’ला रात्री १२ वाजेपर्यंतच वाजवा ‘लाऊडस्पीकर’; पार्ट्यांवर वॉच, नाक्यानाक्यावर पोलीस

नागपूरकरांनो ‘थर्टीफर्स्ट’ला रात्री १२ वाजेपर्यंतच वाजवा ‘लाऊडस्पीकर’; पार्ट्यांवर वॉच, नाक्यानाक्यावर पोलीस

googlenewsNext

नागपूर : २०१९ नंतर प्रथमच निर्बंधांशिवाय ‘थर्टीफर्स्ट’चे आयोजन होत असल्याने नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्साह असताना, नागपूर पोलिसांनीदेखील बंदोबस्ताच्या दृष्टीने विशेष तयारी केली आहे. मद्यपानासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी असली, तरी ‘लाऊडस्पीकर’साठी मात्र रात्री १२ वाजेपर्यंतचीच मुदत देण्यात आली आहे. ‘लाऊडस्पीकर’च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय शहरात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी तसेच तळीरामांवर नियंत्रण रहावे, यासाठी अडीच हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात राहणार आहेत.

३१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेपासून शहरात जागोजागी बंदोबस्त राहणार आहे. पहाटेपर्यंत पोलिस जागोजागी नजर ठेवणार आहेत. ३३ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील १८ हॉटस्पॉट्समध्ये अनुचित घटना होऊ नये यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलिसांनी हद्दपारीतून परत आलेले १२६, मोक्काची शिक्षा भोगून परत आलेले ५४ व एमपीडीएअंतर्गत शिक्षा भोगलेल्या ९७ गुन्हेगारांचा आढावा घेतला आहे. नियमांचे उल्लंघन होत असेल, तर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.

पार्टी आयोजकांकडून नागरिकांची दिशाभूल

अनेकांनी मोठ्या प्रमाणात पार्टीचे आयोजन केले आहे. विविध आयोजकांकडून पोलिसांना ३७ अर्ज आले. त्या सर्वांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र काही आयोजकांनी पहाटे पाच वाजेपर्यंत लॉनमध्ये नाचगाणे चालेल, असे दावे केले आहेत. मात्र लॉन, सोसायटी व इतर सार्वजनिक ठिकाणी रात्री १२ वाजेपर्यंतच लाऊडस्पीकरला परवानगी देण्यात आली आहे. १६ आयोजकांनी पोलिस परवानगी न घेताच आयोजन केले होते. त्यांना पोलिस आयुक्तांनी नियमानुसार परवानगी घेण्याची सूचना केली आहे. आयोजकांना पार्टीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तळीराम, दंगामस्ती करणाऱ्यांवर ‘वॉच’

थर्टीफर्स्टची रात्र आणि मद्यपान हे अनेकांचे समीकरण असते. मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.शहरात २५ ठिकाणी ड्रंक ॲन्ड ड्रायव्हिंग तपासणी पथके राहणार आहेत. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

पार्ट्यांमध्ये साध्या वेशातील महिला पोलिस

थर्टीफर्स्टच्या रात्री महिला सुरक्षेवर विशेष भर देण्यात येणार आहे. छेडछाड विरोधी पथक, दामिनी पथक व भरोसा सेलचे पथक बंदोबस्तासाठी तैनात असेल. याशिवाय गुन्हे शाखेच्या साध्या वेशातील महिला कर्मचारी पार्टीच्या ठिकाणी जाऊन तेथे नजर ठेवणार आहेत.

ड्रिंक केले का? तपासण्यासाठी डिस्पोसेबल पाईप्सचा वापर

कोरोनाचा धोका लक्षात घेता ड्रंक ॲन्ड ड्रायव्हिंगदरम्यान डिस्पोसेबल पाईप्सच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच शहरात अशा प्रकारच्या डिस्पोसेबल पाईप्सचा वापर करण्यात येणार आहे. पोलिसांनी १० हजारांहून अधिक पाईप्स मागवून ठेवले आहेत, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

अशी असेल सुरक्षाव्यवस्था

  •  प्रत्येक पोलिस ठाण्याची दोन पेट्रोलिंग वाहने गस्तीवर
  •  व्यावसायिक पार्टीवर वॉच
  • आवश्यकतेनुसार उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करणार
  • फुटाळा, अंबाझरी परिसरात जास्त बंदोबस्त
  • शहरातील १८ हॉटस्पॉटवर बारीक नजर

Web Title: 'Loudspeaker' allowed only till 12 pm on 31st eve; Blockade at 33 places in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.