नागपूरच्या ‘पीटीएस’मधील प्रेमलीला विशेष शाखेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:32 AM2020-07-18T00:32:16+5:302020-07-18T00:33:21+5:30
पोलीस प्रशिक्षण केंद्रात रंगलेल्या प्रेमलीलेची चौकशी आता विशेष शाखेकडून केली जात आहे. दरम्यान, ‘भरोसा सेल’कडूनही या प्रेमलीलेवर समुपदेशनाच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस प्रशिक्षण केंद्रात रंगलेल्या प्रेमलीलेची चौकशी आता विशेष शाखेकडून केली जात आहे. दरम्यान, ‘भरोसा सेल’कडूनही या प्रेमलीलेवर समुपदेशनाच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे.
शहर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचारी महिलेला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तिने स्वत:सोबत दुसऱ्याच महिलेच्या पतीला आपला पती असल्याचे सांगून पोलीस प्रशिक्षण केंद्रात (पीटीएस) क्वारंटाईन करून घेतल्याचे उघड झाले. या प्रकरणातील दोन बायकांचा दादला बनू पाहणाऱ्या व्यक्तीची पत्नी थेट बजाजनगर पोलीस ठाण्यात पोहचली आणि तिने आपल्या पतीला 'तिच्या' तावडीतून सोडवा, अशी तक्रार नोंदवली. त्यामुळे हे प्रकरण पोलीस दलात चर्चेला आले. दरम्यान, संबंधित व्यक्तीला पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या क्वारंटाईन सेंटरमधून काढून व्हीएनआयटीत पाठविण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी याप्रकरणाची चौकशी विशेष शाखेकडे सोपवली. त्यामुळे विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी बजाज नगर पोलिसांकडून प्राथमिक चौकशीची कागदपत्रे मागून घेतली आहे. या पार्श्वभूमीमुळे विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता या नाजूक प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
उससे मेरे पती को बचाओ
पती तिच्या नादी लागला असला तरी आपल्याला आपल्या पतीसोबतच राहायचे आहे, असे पीडित महिलेने सांगितले आहे. उससे मेरे पती को बचाओ, अशीही तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी तिच्या पतीवर हक्क सांगणाऱ्या महिलेसह संबंधित पुरुषांचेही कौन्सिलिंग करण्याची जबाबदारी भरोसा शाखेला सोपविली आहे. या पार्श्वभूमीवर आता भरोसा सेलही पुढे आले आहे.
अद्याप गाठभेट नाही !
दुसऱ्या महिलेच्या पतीला आपला पती असल्याचे सांगणारी विजेता सध्या क्वारंटाईन आहे. त्यामुळे तिच्याशी आपली अद्याप भेट झालेली नाही. दोन दिवसानंतर तिला सुटी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिची भेट घेऊन तिचे समुपदेशन करण्यात येईल, अशी माहिती भरोसा सेलच्या प्रमुख पोलीस निरीक्षक शुभदा संख्ये यांनी दिली.
एकदा धुलाईही झाली
या प्रकरणात खलनायिका म्हणून उजेडात आलेली महिला पोलीस कर्मचारी यापूर्वीही अनेकदा चर्चेत आली आहे. तर अशाच प्रकरणात विशेष शाखेची, पाचपावली आणि सीताबर्डीतील महिला शिपाई देखील चर्चेत आली होती. एकीची नियंत्रण कक्षासमोर पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने एकदा जबरदस्त धुलाईही केली होती, हा किस्साही आता चर्चेला आला आहे.