लव्ह फॉरेव्हर : तरुणांचे प्रेम आणि पश्चाताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:01 PM2019-05-10T23:01:21+5:302019-05-10T23:02:42+5:30
नवीन तरुणाई दिशाहीन आहे, नक्की कुणावर प्रेम करावे, हे त्यांना कळतं, भावनेच्या भरात प्रेमात पडतात आणि दिशा चुकली की पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. आताच्या तरुण पिढीबाबत अनेकांचे काहीसे असेच विचार आहेत. पण खरंच असे आहे का? अशा विचारांची गुंतागुंत मांडणारी एकांकिका म्हणजे ‘लव्ह फॉरेव्हर’. या एकांकिकेचा प्रयोग नुकताच प्रेक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत गजानननगरच्या समाजभवन रंगमंचावर सादर झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन तरुणाई दिशाहीन आहे, नक्की कुणावर प्रेम करावे, हे त्यांना कळतं, भावनेच्या भरात प्रेमात पडतात आणि दिशा चुकली की पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. आताच्या तरुण पिढीबाबत अनेकांचे काहीसे असेच विचार आहेत. पण खरंच असे आहे का? अशा विचारांची गुंतागुंत मांडणारी एकांकिका म्हणजे ‘लव्ह फॉरेव्हर’. या एकांकिकेचा प्रयोग नुकताच प्रेक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत गजानननगरच्या समाजभवन रंगमंचावर सादर झाला.
संजय भाकरे फाऊंडेशनच्या दरमहा एकांकिका उपक्रमांतर्गत नवोदित कलावंतांसाठी वाचिक अभिनय ते प्रत्यक्ष प्रयोग या महिनाभराच्या कार्यशाळेनंतर लव्ह फॉरेव्हरसह ‘वीसाचे गणित’ या एकांकिकेचेही सादरीकरण यावेळी झाले. फाऊंडेशनतर्फे लव्ह फॉरेव्हर ही ३९ वी आणि वीसाचे गणित ही ४० वी एकांकिका होती. तरुण लेखक विशाल कदम यांच्या लेखणीतून लव्ह फॉरेव्हर हे नाटक साकार झाले. नाटकातील प्रियकर (श्रीराम डोंगरे) हा उत्तम चित्रकार असतो. त्याची प्रेयसी (हर्षदा देशपांडे) हिच्यावर मनापासून प्रेम करतो. इटलीला जाऊन आपल्या प्रेयसीचे ‘मोनालिसा’ पेक्षा सुंदर चित्र काढावे, असा विचार मनात ठेवून संसाराचे स्वप्न पाहतो. पण एक दिवस त्याचे स्वप्न भंग होते. वडील तयार नसल्याने आपले लग्न होऊ शकत नाही, असे सांगून ‘ती’ त्याला दूर जाण्यास सांगते आणि त्याने सजविलेल्या सुखी संसाराची कोवळी स्वप्ने करपून जातात. त्याचे आर्जव, विनवण्या सर्व कुचकामी ठरतात. प्रेमभंगामुळे देवदास झालेल्या त्याला त्याचा मित्र (सिद्धार्थ क्षीरसागर) समजावतो. हा मित्र व्हॉटस्अॅपच्या ‘प्रेमभंगी ग्रुप’चा अॅडमिन असतो. विशेषत: त्याच्या मित्राच्या तोंडचे संवाद प्रेक्षकांना भावणारे आहेत. नाटकात तरुण कलावंतांच्या अभिनयाची उत्तम भट्टी जमली आहे. दिग्दर्शन संकल्प पायाळ यांनी केले. प्रकाशयोजना बाल्या लारोकर, संगीत कनक खापर्डे, सूत्रधार ऐश्वर्या डोरले या होत्या.
फाऊंडेशनची ४० वी एकांकिका ‘वीसाचे गणित’ यानंतर सादर झाली. गावातील दोन मैत्रिणींची ही कथा. एक आई-वडिलांच्या संस्कारात मोठी होऊन शिक्षिका होते तर दुसरी आई-वडिलांच्या प्रेमाला पारखी असल्यामुळे गावातल्या उनाड मुलांसोबत राहून वेगळ्याच मार्गाला लागते. लहानपणीचे वीस अधिक वीस चाळीस होतात हे गणित उमजत नाही. दोन भिन्न विचारधारा एकत्र होऊ शकत नाही आणि मैत्री कायमची संपते. मैत्रिणीचे स्वभावदर्शन यात उलगडण्यात आले आहे.
धनश्री लोहकरे व आनंदी रहाटगावकर यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन संकेत महाजन यांनी केले. हृषिकेश देशमुख, तेजस, समीर गोखले, सार्थक पांडे, डॉ. सागर देशपांडे, अमिषा यादव, पूजा गोळे यांनी सहकार्य केले. निर्मिर्ती अनिता भाकरे यांची होती. हे सर्व कलावंत पहिल्यांदाच रंगमंचावर आली. पण त्यांचा सहजसुंदर अभिनय लक्षात राहतो. संवादाचे पाठांतर, अचूक टायमिंग, चेहऱ्यावरील हावभाव, रसिकांची दाद घेणारे होते.