नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे प्रेमविवाहातून मुलाच्या मामाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:55 AM2018-03-21T11:55:07+5:302018-03-21T11:55:15+5:30
प्रेमविवाह केल्यामुळे वधूपक्षाकडील मंडळींनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्या बचावासाठी धावलेल्या त्याच्या मामावरही वार करण्यात आले. त्यात गंभीर जखमी होऊन तरुणाच्या मामाचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेमविवाह केल्यामुळे वधूपक्षाकडील मंडळींनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्या बचावासाठी धावलेल्या त्याच्या मामावरही वार करण्यात आले. त्यात गंभीर जखमी होऊन तरुणाच्या मामाचा मृत्यू झाला. या घटनेत तरुणाच्या भावासह आजी - आजोबाही जखमी झाले आहे. कामठीच्या रामगड भागात सोमवारी मध्यरात्रीनंतर १२.३० वाजताच्या सुमारास झालेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांची अतिरिक्त कुमक, क्युआरटी (क्वीक रिस्पॉन्स पथक) तैनात करण्यात आले. त्यामुळे संचारबंदीसदृश स्थिती निर्माण झाली.
इकबाल जमील शेख (३७, रा. रामगड, कामठी) असे मृताचे नाव असून, या हल्ल्यात मुलाची आजी जरीन बी (६५), आजोबा जमीर शेख (७०) व शेख अल्ताफ शेख जमील, तिघेही रा. रामगड, कामठी हे जखमी झाले असून, त्यांच्यावर कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सय्यद इरफान शेख (२३, रा. रामगड, कामठी) याने परिसरातील तरुणीसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम असूनही दोघांच्या कुटुंबीयांनी या विवाहाला विरोध दर्शविला होता. त्यामुळे दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी सावनेरात वर पक्षाच्या उपस्थितीत त्यांनी लग्नही केले. त्यानंतर पाच दिवसांआधीच तो कामठीत नववधूसह परतला. त्यानंतर गुरुवारी (दि. १५) सय्यदच्या आईने नववधूला तिच्या माहेरी पोहोचविले. तिच्या कुटुुंबीयांची समजूत काढून दोघांचेही रीतीरिवाजाप्रमाणे लग्न लावून देण्याची सूचना केली.
दरम्यान, सोमवारी (दि. १९) रात्री ११ वाजताच्या सुमारास नववधूच्या कुटुंबीयांनी सय्यदच्या कुटुंबीयांशी भांडणाला सुरुवात केली.
परिसराला छावणीचे स्वरूप
या घटनेमुळे रामगड भागात तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रमेश परदेशी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून लगेच अतिरिक्त पोलीस कुमक बोलावण्यात आली. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सय्यदच्या घराजवळ दिवसभर पोलीस बंदोबस्त होता.
आरोपींची नावे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये नवाब रहमान शेख (४५), सलमान नवाब शेख (२०), समीर नवाब शेख (१८), इस्माईल अजिज खान (३५), रज्जाक अजिज खान (२८), सईद अजिज खान (३०), जब्बार रेहमू खान, खुर्शीद हुसेन शेख (४५), शेख सिकंदर (२४), फिरोज (२२), नसुरू (२६), काल्या ऊर्फ मुस्तफा खान (२३), काल्याचा मोठा भाऊ, गोलू (२८), चाँद खान (३०), चाँदचा भाऊ, उस्मान खान (२५), नजर मोहम्मद खान (१९), जहूर खान, शेख अलीम मुस्तफा (५९), शेख साबीर इब्राहिम (१९), काल्या ऊर्फ मोहम्मद रफीक शेख (४६) यांचा समावेश आहे.