नागपुरात प्रेयसीच्या साक्षगंधात प्रियकराचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:41 PM2019-02-11T23:41:44+5:302019-02-11T23:44:27+5:30
प्रेमसंबंधानंतर लग्नाच्या आणाभाका घेऊन दोन वर्षे सोबत असलेल्या तरुणीने दुसरीकडेच लग्न जुळविल्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या साक्षगंधात गोंधळ घातला. प्रेयसीसह तिच्या नातेवाईकांना मारहाण केली. पाहुण्यांसाठी तयार करण्यात आलेले जेवण फेकले आणि प्रेयसीच्या भावी प्रियकराला जीवे मारण्याची धमकी दिली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेमसंबंधानंतर लग्नाच्या आणाभाका घेऊन दोन वर्षे सोबत असलेल्या तरुणीने दुसरीकडेच लग्न जुळविल्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या साक्षगंधात गोंधळ घातला. प्रेयसीसह तिच्या नातेवाईकांना मारहाण केली. पाहुण्यांसाठी तयार करण्यात आलेले जेवण फेकले आणि प्रेयसीच्या भावी प्रियकराला जीवे मारण्याची धमकी दिली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पुनित एकनाथ राऊत (वय ३०, रा. चॅटर्जी लेआउट, जरीपटका) याच्यासोबत २७ वर्षीय तरुणीचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्यांच्या प्रेमसंबंधाला पुनितच्या आईवडीलाचा होकार होता. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांकडून नकार होता. मात्र, काही झाले तरी मी दुस-यासोबत लग्न करणार नाही, असे तिने पुनितला सांगितले होते. त्यामुळे तो निश्चिंत होता. रविवारी रात्री अचानक तिच्या सांक्षगंधाचा कार्यक्रम सुरू असल्याचे पुनितला कळले. वस्तीतच घर असल्याने आरोपी पुनित तेथे धडकला. तू माझ्यासोबत प्रेम करते आणि लग्न दुस-यासोबत कसे जुळविले, असा प्रश्न करून त्याने तिचा हात पकडला. या प्रकारामुळे साक्षगंधांच्या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. तरुणीच्या भावाने पुनितला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याला आणि अन्य नातेवाईकांना मारहाण केली. यावेळी आरोपी सुजित, राकेश हे दोन भाऊ आणि वडील एकनाथ शिवराम राऊत यांनीही तेथे पोहचून आरडाओरड सुरू केला.तरुणीच्या नातेवाईकांनी आरोपींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी तरुणी तसेच तिच्या आईला शिविगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर पुनितने तरुणीचा हात पकडून तिच्या भावी पतीजवळ नेले. तू हिच्याशी लग्न केले तर तुलाही ठार मारेन, अशी धमकी दिली. आरोपींनी कार्यक्रमातील साहित्याची फेकाफेक केली तसेच पाहुण्यांसाठी बनविलेले जेवणही फेकून दिले. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे संपूर्ण मोहल्लाच तेथे गोळा झाला. माहिती कळताच जरीपटका पोलीस पोहचले. दरम्यान,आज दुपारी तरुणी तेथे पोहचली. तिच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी पुनित व त्याच्या उपरोक्त नातेवाईक आरोपींविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. या घटनेची सोशल मिडियावरही या प्रकरणाची सोमवारी दिवसभर चर्चा होती.