प्रेमी युगुल विहिरीत बुडाले
By admin | Published: October 26, 2015 02:42 AM2015-10-26T02:42:28+5:302015-10-26T02:42:28+5:30
दारूच्या नशेत टुन्न झालेल्या मैत्रिणीने विहिरीत उडी मारली. सोबत तिने मित्राचाही हात पकडला.
दारूच्या नशेतील मैत्रिणीने केला घात : कळमन्यातील घटना
नागपूर : दारूच्या नशेत टुन्न झालेल्या मैत्रिणीने विहिरीत उडी मारली. सोबत तिने मित्राचाही हात पकडला. त्या मित्राने आपल्या मित्राचा हात पकडला. त्यामुळे तिघेही खोल विहिरीत बुडाले. नशीब बलवत्तर म्हणून एकाचा जीव वाचला. दोघे मात्र गतप्राण झाले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली.
कापसी उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या धारगाव शिवारात वालदे यांचे शेत आहे. नंदनवनच्या चिटणीसनगरात राहाणारा कुणाल प्रभाकर बिजवे (वय २५), इम्रान खान (वय अंदाजे २५) आणि त्याची मैत्रिण प्रिया (वय अंदाजे २५) हे तिघे ‘पार्टी’साठी रविवारी दुपारी ४ च्या सुमारास धारगाव शिवारात गेले. तेथे तिघेही यथेच्च दारू पिले. त्यानंतर हे तिघेही वालदेच्या शेतातील विहिरीच्या काठावर बसले. विहिरीत पाय टाकून बसलेल्या प्रियाची एकूणच देहबोली लक्षात आल्यामुळे कुणाल उठून उभा झाला. तो इम्रानच्या बाजूला उभा होता. नशेत डोलणाऱ्या प्रियाने अचानक पाण्यात उडी घेतली. यावेळी तिने इम्रानचा हात पकडला. त्यामुळे तिच्यासोबतच इम्रानही पाण्यात पडला. मात्र, विहिरीत पडण्यापूर्वी इम्रानने कुणालचा हात पकडल्याने या दोघांसोबत कुणालही विहिरीत पडला. तिघेही दारूच्या नशेत तर्र होते. त्यांना पोहणेही येत नव्हते. त्यामुळे ते गटांगळ्या खाऊ लागले. काहीसा हुशारीत असलेल्या कुणालने विहिरीचा काठ घट्ट पकडून ठेवल्यामुळे तो पाण्यावर राहिला. प्रिया आणि इम्रान त्याच्या डोळ्यादेखत बुडाले. (प्रतिनिधी)
पोलिसांनी वाचविला जीव
धारगाव शिवारात गुन्हेगार आणि अनैतिक कृत्य करणाऱ्यांची सारखी वर्दळ असते. त्यामुळे या भागात पोलीसही अलीकडे गस्त घालू लागले आहेत. रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास कळमना पोलीस गस्त घालत असताना त्यांना विहिरीतून बचाव बचाव असा आवाज आला. त्यामुळे एएसआय आनंद राव आणि शिपाई राहूल इंगोले तिकडे धावले. विहिरीत कुणाल आढळला. त्याला पोलिसांनी बाहेर काढले. नंतर त्याच्या पोटातील पाणी काढून त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्यामुळे कुणालचा जीव वाचला.
रात्री निघाला मृतदेह
या घटनेचे वृत्त कळताच परिसरात खळबळ निर्माण झाली. मोठ्या संख्येत नागरिक घटनास्थळी धावले. कळमन्याचे पीएसआय राम मोहिते, पीएसआय राऊत आपल्या ताफ्यासह पोहचले. त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलवून घेतले. अथक प्रयत्नानंतर रात्री ८ नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रियाचा मृतदेह बाहेर काढला. इम्रानचा मृतदेह विहिरीतून काढण्याचे प्रयत्न सुरू होते.