गर्भपातानंतर प्रियकराचे घूमजाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:25+5:302021-07-20T04:07:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - प्रेयसीला गर्भवती बनवून तिचा गर्भपात करवून घेतल्यानंतर अभियंता असलेल्या प्रियकराने तिच्याशी दगाबाजी केली; मात्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - प्रेयसीला गर्भवती बनवून तिचा गर्भपात करवून घेतल्यानंतर अभियंता असलेल्या प्रियकराने तिच्याशी दगाबाजी केली; मात्र त्याच्या दगाबाजीमुळे रविवारी जरीपटका पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे आता त्याच्यावर पोलीस कोठडीत जाण्याची वेळ आली आहे.
हितेश अशोक महाजन (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. तो अभियंता असून नागपुरात नोकरी करतो. त्याच्याच गावातील एका २६ वर्षीय तरुणीला रुग्णालयात नोकरी मिळाल्याने तीसुद्धा येथेच राहायला आली. एकाच गावातील असल्याने दोघांमध्ये ओळख होती. भेटीगाठी नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपी हितेश जरीपटक्यातील जागृतीनगरात भाड्याने राहात होता. तेथे भेटीदरम्यान दोघांनी लग्नाच्या आणाभाका केल्या आणि लग्नापूर्वीच वारंवार शरीरसंबंधही प्रस्थापित करू लागले. त्यामुळे ती गर्भवती झाली. सध्या बहिणीचे लग्न असल्याने गर्भपात करून घे. नंतर आपण लग्न करू, असे म्हणून हितेशने तिचा गर्भपात करून घेतला. यावेळी हितेशच्या नातेवाईकांनीही दोघांच्या लग्नास संमती दिली. ३१ मार्च ते ३ जुलै २०२१ दरम्यान या घडामोडी झाल्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तरुणीचे आईवडील आणि हितेशचे आईवडील लग्नाचा निर्णय घेण्यासाठी भेटले. यावेळी हितेशने लग्नास नकार दिला. दोन्हीकडून त्याची समजूत काढूनही त्याची नकारघंटा कायम राहिली. त्यामुळे तरुणीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी रविवारी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
---