डिलिव्हरीच्या अगोदर काढला जात होता सिलिंडरमधून एलपीजी गॅस, तुम्हीदेखील तपासून घ्या वजन
By योगेश पांडे | Published: July 30, 2024 02:24 PM2024-07-30T14:24:27+5:302024-07-30T14:28:18+5:30
सिलिंडर एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल : सजग ग्राहकामुळे उघडकीस आला गोरखधंदा
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एलपीजी सिलिंडर डिलिव्हर करण्याअगोदर त्यातून गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून त्यांची परस्पर विक्रीचे रॅकेट समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सिलिंडर एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घरी सिलिंडर आल्यानंतर नागरिक ते विश्वासाने घरी ठेवून घेत होते. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना दोन ते तीन किलो कमी वजनाचे सिलिंडर पुरविण्यात येत होते. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.
सजग ग्राहक दयासागर सुरेशराव चव्हाण (४३, गिट्टीखदान) यांच्या सतर्कतेमुळे हा गोरखधंदा उघडकीस आला. त्यांचा एचपी एलपीजी सिलिंडर वितरक रविनगरातील गांधी गॅस एजन्सी आहे. त्यांनी ऑनलाईन माध्यमातून सिलिंडर बुक केला होता. काही महिन्यांपासून त्यांना घरी येणाऱ्या सिलिंडरचे वजन कमी असल्याचे वाटत होते. २७ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता त्यांना सिलिंडरच्या गाडीचा आवाज आला. त्यांनी बाल्कनीतून खाली पाहिले असता दोन कर्मचारी नळीच्या सहाय्याने रिकाम्या सिलिंडरमध्ये भरलेल्या सिलिंडरमधून गॅस भरत होते. त्यानंतर ते कर्मचारी चव्हाण यांच्या घरी आले व सिलिंडर डिलिव्हर केले. चव्हाण यांनी वजन केले असता ते तीन किलो कमी भरले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांना पूर्ण वजनाचे सिलिंडर दिले. मात्र चव्हाण यांना हा प्रकार खटकला. त्यांनी परिसरातील नागरिकांना बोलवून त्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. त्यांची नावे रमेश गोदारा (३५, जगदीशनगर, गिट्टीखदान) व सुदेंदर भाखरराम जानी (२१, जगदीशनगर) अशी होती. दोघेही मुळचे राजस्थानमधील आहेत. हाय प्रेशर रेग्युलेटरच्या माध्यमातून प्रत्येक सिलिंडरमधून थोडा गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरत होतो, अशी त्यांनी कबुली दिली. त्यांच्या गाडीत त्यावेळेला एचपी कंपनीचे २० भरलेले सिलिंडर, सहा रिकामे सिलिंडर व ५ अर्धवट भरलेले सिलिंडर होते. चव्हाण त्यांना घेऊन गिट्टीखदान पोलीस ठाण्यात पोहोचले व तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वजन तपासणे अत्यावश्यक
अनेक ग्राहकांकडून सिलिंडरचे वजन कमी असल्याची तक्रार करण्यात येते. त्यामुळे सिलिंडर घरी आल्यावर त्याचे वजन तपासून घेणे अत्यावश्यक ठरते. संबंधित प्रकरणात प्रत्येकच सिलिंडरमधून एलपीजी गॅस बाहेर काढण्यात येत होता. हा प्रकार कधीपासून सुरू होता व गॅस एजन्सीतून यात आणखी कोण सहभागी आहे याची चौकशी सुरू आहे.