'लकी ड्रॉ' काढून खाऊ गल्लीत डोम वाटप : ५ जानेवारीला उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:42 AM2019-12-31T00:42:43+5:302019-12-31T00:43:52+5:30
मागील काही वर्षांपासून दुर्लक्षित असलेली खाऊ गल्ली ५ जानेवारीला सुरू होत आहे. येथे ३२ डोम उभारण्यात आले आहेत. परंतु यासाठी ७२ अर्ज आले आहेत. यामुळे निर्माण झालेला डोम वाटपाचा पेच सोडविण्यासाठी ‘लकी ड्रॉ’ काढण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही वर्षांपासून दुर्लक्षित असलेली खाऊ गल्ली ५ जानेवारीला सुरू होत आहे. येथे ३२ डोम उभारण्यात आले आहेत. परंतु यासाठी ७२ अर्ज आले आहेत. यामुळे निर्माण झालेला डोम वाटपाचा पेच सोडविण्यासाठी ‘लकी ड्रॉ’ काढण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
खाऊ गल्लीसाठी निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार विक्रे त्यांना दरमहा ५ हजार रुपये भाडे व ५ हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागतील. मागील काही वर्षांत खाऊ गल्लीची दुरुस्ती झालेली नव्हती. उभारण्यात आलेल्या डोमचे छत जागोजागी जीर्ण झाले होते. तसेच फूटपाथ व पायऱ्यांची दुरुस्ती, पार्किंग सुविधा अशी कामे अंतिम टप्प्यात आहेत.
खाऊ गल्ली येथे होणारी गर्दी विचारात घेता, गांधीसागर तलावाच्या एका बाजूला पार्किंग सुविधा केली जाणार आहे. महापौर संदीप जोशी यांच्या निर्देंशानुसार, खाऊ गल्ली येथे आवश्यक असलेली कामे हाती घेण्यात आली. दरम्यान, प्रदीप पोहाणे व जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना खाऊ गल्ली ५ जानेवारीपर्यंत उद्घाटनासाठी सज्ज ठेवण्याचे आदेश महापौरांनी दिले.
महापौरांच्या ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’, ‘ ब्रेकफास्ट विथ मेयर’ या कार्यक्रमांमध्ये खाऊ गल्लीसंदर्भात नागरिकांनी अनेक तक्रारी मांडल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी काही दिवसांपूर्वी दौरा करून खाऊ गल्लीचे निरीक्षण केले. यावेळी खाऊ गल्लीतील पार्किंगमधील तुटलेले फ्लोरिंग तातडीने दुरुस्त करणे, आय ब्लॉक दुरुस्ती, नागरिकांसाठी वॉटर एटीएम, परिसरातील पथदिवे तातडीने सुरू करून रेलिंगला लागून असलेली झुडपे काढून परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले होते.
खाऊ गल्लीमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या राहणार आहे. ही बाब लक्षात घेता तलावाच्या एका बाजूला पार्किंग व्यवस्था क रण्यात आली आहे.