नागपूरमध्ये लम्पी पोहोचल्याचा संशय; दोन गावांत सदृश आजाराचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 10:26 AM2022-09-14T10:26:22+5:302022-09-14T10:30:55+5:30
पशुपालकांना सतर्कतेचा इशारा
नागपूर : महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लम्पीसदृश आजाराची लक्षणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दोन गावांमध्ये दिसून आली आहेत. जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून, पाच किलोमीटर परिसरात पशुपालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी सावनेर तालुक्यातील बडेगाव आणि उमरी जांभळापाणी या दोन गावांमध्ये लंपीरोगसदृश लक्षणे दर्शवणारे अनुक्रमे तीन आणि सहा अशा एकूण नऊ पशुरुग्णांची नोंद झाली. ही बाब कळताच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, सहायक पशुवैद्यकीय आयुक्त डॉ. युवराज केने यांनी तत्काळ बाधित गावांना भेट देऊन तपासणी केली. नमुने गोळा करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. ते रोगनिदानासाठी रोग अन्वेषण विभाग, पुणे येथे पाठवले जाणार आहेत.
पशुपालकांना आवाहन
पशुपालकांना रोगाबाबत माहिती देऊन प्रतिबंधक उपाययोजनेची माहिती देण्यात आली असून, गावातील सर्व गोठे, साचलेली डबकी, निरोगी जनावरे यांची फवारणी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या आजारावर इलाज असून नागरिकांनी जनावरामध्ये लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी, घाबरून जाऊ नये, योग्य उपचार करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
७२ तासांत लस दिली जाणार
या गावांच्या आजूबाजूला पाच किलोमीटरच्या हद्दीमध्ये जवळपास वीस गावांचा समावेश असून त्यामध्ये सुमारे ५,१२६ गोवंशीय पशुधनाची संख्या आहे. या सर्व जनावरांना, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार गोट पॉक्स उत्तर काशी स्ट्रेन ही लस दिली जाणार आहे. लसीकरणाचे काम येत्या ७२ तासांत पूर्ण करण्यासाठी नियोजन केलेले आहे.
रोगाने बाधित जनावरांना तत्काळ निरोगी जनावरांपासून वेगळे बांधण्यात यावे आणि त्यांचा औषधोपचार जागीच करण्यात यावा. रोगाने बाधित झालेली जनावरे विकू नयेत अथवा त्यांची वाहतूक करू नये.
- विपिन इटनकर, जिल्हाधिकारी