बुद्धपाैर्णिमेला लागेल चंद्राला ग्रहण; रात्री ८.४४ वाजता भारतातून दिसेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2023 21:45 IST2023-04-29T21:45:30+5:302023-04-29T21:45:53+5:30
Nagpur News यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण येत्या ५ मे राेजी बुद्ध पाैर्णिमेच्या दिवशी अनुभवायला मिळणार आहे. हे ग्रहण पेनम्ब्रल असेल म्हणजे ग्रहणातही चंद्राच्या तेजस्वीतेवर फारसा फरक पडणार नाही.

बुद्धपाैर्णिमेला लागेल चंद्राला ग्रहण; रात्री ८.४४ वाजता भारतातून दिसेल
नागपूर : भारतीयांना यावर्षीचे पहिले सूर्यग्रहण जरी पाहता आले नाही तरी निराश हाेण्याची गरज नाही. चंद्रग्रहणाचा पूर्ण आनंद मात्र देशवासीयांना घेता येईल. यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण येत्या ५ मे राेजी बुद्ध पाैर्णिमेच्या दिवशी अनुभवायला मिळणार आहे. हे ग्रहण पेनम्ब्रल असेल म्हणजे ग्रहणातही चंद्राच्या तेजस्वीतेवर फारसा फरक पडणार नाही.
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि पृथ्वी जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच दिसते. चंद्रग्रहणात आपण चंद्रावर पडलेली पृथ्वीची सावली पाहत असल्याने पृथ्वीच्या अनेक भागातून हे संबंधित वेळी दिसते. यावेळी ५ मे राेजी चंद्रग्रहणाचा साेहळा पाहण्याची संधी खगाेलप्रेमींना मिळणार आहे. मात्र, सावलीने चंद्राचा पूर्ण भाग झाकलेला नसेल. पृथ्वीच्या बाह्य सावलीने चंद्र झाकलेला असेल, पण त्याची प्रकाशमय आभा दिसत राहील. भारतातून साधारणत: रात्री ८:४४ वाजल्यापासून ग्रहण पाहता येईल. रात्री १०:३० पासून ग्रहण वाढलेले असेल आणि रात्री १०:५२ वाजता सर्वाधिक झाकलेला असेल. रात्री १ वाजता ग्रहण संपेल. भारतातून ४ तास १८ मिनिटे हे ग्रहण चालेल. हे ग्रहण उघड्या डाेळ्यांनीही पाहता येणार आहे.
ग्रहणात प्राणी गणना
साधारणत: बुद्ध पाैर्णिमेला भारतात व्याघ्र गणना व प्राणी गणना केली जाते. यावर्षीही प्राणीगणनेसाठी वनविभागाने तयारी सुरू केली आहे. मात्र, यावर्षी बुद्धपाैर्णिमेला चंद्रग्रहण हाेणार आहे. भारतात चार तासांहून अधिक काळ रात्री १ वाजेपर्यंत ग्रहण चालणार आहे. त्यामुळे वनविभागाला ग्रहणातच व्याघ्र गणना करावी लागणार आहे.