‘लंच बॉक्स’चा उपक्रम प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 01:14 AM2017-09-04T01:14:20+5:302017-09-04T01:14:38+5:30
मागील काही वर्षात गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी वाढली आहे. अन्नदात्या शेतकºयांची परिस्थिती दयनीय आहे. एकीकडे अन्नाची नासाडी तर दुसरीकडे भुके लेल्यांना अन्न नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही वर्षात गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी वाढली आहे. अन्नदात्या शेतकºयांची परिस्थिती दयनीय आहे. एकीकडे अन्नाची नासाडी तर दुसरीकडे भुके लेल्यांना अन्न नाही. अशा विषम परिस्थितीत गरीब रुग्णांच्या नातेवाईकांसाठी युवा झेप प्रतिष्ठानतर्फे सुरू करण्यात आलेली दीनदयाल लंच बॉक्स योजना कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन इंटरनॅशनल ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी रविवारी केले. सायंटिफिक सभागृहात रविवारी आयोजित कार्यक्रमात युवा झेप प्रतिष्ठानच्या दीनदयाल लंच बॉक्स योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आमदार डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, महापालिकेतील सत्तापक्षनेते व युवा झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप जोशी, अखिल भारतीय व्यापारी परिसंघाचे अध्यक्ष बी.सी.भरतीया, गोरक्षण सभाचे अध्यक्ष श्रीपाद रिसालदार व प्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर आदी उपस्थित होते. मंदिरात दान देण्यासाठी हात पुढे येतात. पण गरज असलेल्यांना मदतीसाठी पुढे येत नाही. गोरक्षणने रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासासाठीही जागा उपलब्ध करावी, अशी सूचना चंद्रशेखर मेश्राम यांनी केली. या उपक्रमाला सामाजिक जाणिवेतून हातभार लावा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लंच बॉक्स उपक्रमाची प्रशंसा केली आहे. मेडिकल रुग्णालयात या उपक्रमासाठी जागा उपलब्ध करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली. या उपक्रमासाठी पहिला धनादेश माझ्या आईने दिला. त्यनंतर सर्व स्तरातून मदत सुरू झाली. हा उपक्रम आजीवन सुरू राहावा. कुणीही उपाशी राहू नये, अशी अपेक्षा जोशी यांनी व्यक्त केली.
आठवड्यातील एका दिवसाच्या उपवासाचे धान्य या उपक्रमाला द्या, असे आवाहन करून या उपक्रमात व्यापारी सोबत असल्याची ग्वाही बी. सी. भरतीया यांनी दिली. श्रीपाद रिसालदार यांनीही गोरक्षणच्या माध्यमातून या उपक्रमाला मदत करण्याची ग्वाही दिली. विष्णू मनोहर यांनीही मार्गदर्शन केले.
प्रारंभी गोरक्षण येथील दीनदयाल लंच बॉक्स योजनेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.