नागपूर शहरात पहिल्यांदाच झाले फुफ्फुस दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:36 AM2019-09-21T00:36:48+5:302019-09-21T00:38:22+5:30
उपराजधानीच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. शहरात अकरावे अवयवदान करण्यात आले व महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदाच फुफ्फुस दानदेखील झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. शहरात अकरावे अवयवदान करण्यात आले व महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदाच फुफ्फुस दानदेखील झाले. ५८ वर्षीय नत्थुजी वंजारी यांचे अवयवदान झाल्यामुळे चार रुग्णांना नवे आयुष्य मिळाले. फुफ्फुस मुंबईतील रुग्णालयात आणण्यासाठी न्यू-एरा रूग्णालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असा ‘ग्रीन-कॉरिडोर’ तयार करण्यात आला होता.
नथ्थुजी वंजारी नागपूरमध्ये बीएसएनएलमध्ये कार्यरत होते. १७ सप्टेंबर रोजी त्यांना हात दुखणं, उलट्या होणं तसंच अचानक घाम आल्याचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना ‘स्ट्रोक’ आल्याचे निदान केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले मात्र त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आलं. त्यानंतर डॉ. संदीप नागमोटे यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानासंदर्भात समुपदेशन केलं. यासाठी रुग्णाला नागपूरच्या ‘न्यू-इरा’ रूग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णाच्या नातेवाईकांनी पहिल्यांदा हृदय दान करण्याची परवानगी दर्शवली. मात्र काही कारणांमुळे हृदय दान होऊ शकत नव्हतं. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांचं समुपदेशन करण्यात आलं. त्यानंतर अवयवदानाला परवानगी मिळाली आणि रुग्णाचं फुफ्फुस, दोन्ही किडनी आणि लिव्हर दान करण्यात आलं आहे. या अवयवदानामुळे नागपूर शहरात पहिल्यांदाच फुफ्फुस दान करण्यात आलं आहे. तर नागपूर विभागातील हे तिसरं फुफ्फुस दान होते, अशी माहिती ‘झेटीसीसी’च्या समन्वयक वीणा वाठोरे यांनी दिली. वंजारी यांचे फुफ्फुस मुंबईतील रुग्णाला दान करण्यात आले. दोन किडन्या नागपुरातील वेगवेगळ्या रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आला. तर यकृत शहरातीलच एका ५४ वर्षीय रुग्णाला दान करण्यात आले.