अॅक्सिस बँकेत नोकरीचे आमिष : महिलेची फसवणूक, ९२ हजार हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 09:06 PM2019-06-20T21:06:03+5:302019-06-20T21:08:19+5:30
अॅक्सिस बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित महिलेची सायबर गँगने फसवणूक केली. अनामिका शर्मा, दीपक कुमार आणि अभिषेक शर्मा अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे असून ते सर्व गुडगाव (हरियाणा) येथील रहिवासी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अॅक्सिस बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित महिलेची सायबर गँगने फसवणूक केली. अनामिका शर्मा, दीपक कुमार आणि अभिषेक शर्मा अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे असून ते सर्व गुडगाव (हरियाणा) येथील रहिवासी आहेत.
अश्विनी अरुण बुराडे (वय ३२) या वर्धा मार्गावरील जुने स्रेहनगर येथे राहतात. ३ मे रोजी दुपारी १२. ३० च्या सुमारास त्यांना उपरोक्त आरोपींनी संपर्क केला. तुम्ही राहात असलेल्या शहरात अॅक्सिस बँकेत व्यवस्थापकाची जागा रिक्त आहे, असे सांगून आरोपींनी अश्विनी यांना ती नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी अश्विनी यांना अर्ज करण्यासाठी ४ हजार रुपये आणि व्हेरिफिकेशनच्या नावावर नंतर १० हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा करायला सांगितले. त्या नंतर २३ मे पर्यंत आरोपींनी वेगवेगळ्या नावाखाली अश्विनी यांच्याकडून ९२ हजार रुपये कॅनरा बँकेच्या गुडगाव शाखेतील आपल्या खात्यात जमा करून घेतले. एवढी रक्कम घेतल्यानंतरही प्रत्येक वेळी काही ना काही सबब सांगून आरोपी अश्विनी यांना रक्कम जमा करण्यास सांगत होते. त्यामुळे अश्विनी यांना संशय आला. त्यांनी आरोपींना आपली रक्कम परत मागितली असता आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात आल्याने अश्विनी यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचे कलम ४२० भादंवि तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आरोपींचा शोध घेतला जात आहे.
अनेकांची फसवणूक
दिल्ली, नोएडात बसलेले गुन्हेगार तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अशा प्रकारे रोजच अनेकांची फसवणूक करतात. तसे गुन्हेही देशभरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल होतात. मात्र, या ठगबाजांना अटक करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. ते गरीब व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर करून बँकेत खाते उघडतात आणि फसवणूक केलेल्यांची रक्कम खात्यात जमा होताच एटीएमने काढून घेतात.