नागपुरात एमबीबीएस अॅडमिशनचे आमिष : दहा लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:24 PM2018-07-27T23:24:38+5:302018-07-27T23:26:25+5:30
देशातील सर्वात मानाचे वैद्यकीय महाविद्यालय असा लौकिक असलेल्या सेवाग्राम (वर्धा) येथील म. गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची अॅडमिशन करून देतो, अशी बतावणी करून एका टोळीने हरियाणातील व्यक्तीला १० लाखांचा गंडा घातला. ६ ते २६ जुलै दरम्यान घडलेल्या या बनवाबनवीची तक्रार सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील सर्वात मानाचे वैद्यकीय महाविद्यालय असा लौकिक असलेल्या सेवाग्राम (वर्धा) येथील म. गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची अॅडमिशन करून देतो, अशी बतावणी करून एका टोळीने हरियाणातील व्यक्तीला १० लाखांचा गंडा घातला. ६ ते २६ जुलै दरम्यान घडलेल्या या बनवाबनवीची तक्रार सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
गोविंद राम शर्मा (वय ४८) असे तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ते फरिदाबाद, हरियाणा येथील रहिवासी आहेत. त्यांना चिराग नामक मुलगा असून, त्याला डॉक्टर बनविण्याचे गोविंद शर्मा यांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी शर्मा कुटुंबीय अनेक दिवसांपासून आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहेत. एमबीबीएसला प्रवेश मिळवण्यासाठी चिरागने पूर्वपरीक्षा दिली मात्र त्यात अपेक्षित महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला नाही. दरम्यान, ६ जुलैला त्यांच्या मोबाईलवर 8987086065 या नंबरवरून फोन आला. आपण रतन राय बोलतो, असे आरोपीने सांगितले. चिरागला सेवाग्रामच्या मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून देतो, त्यासाठी १० लाख रुपये खर्च येईल, असे कथित रतन रायने सांगितले. मुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न घेऊन जगणाºया शर्मा दाम्पत्याने प्रारंभिक चौकशी केल्यानंतर रक्कम घेऊन नागपूर गाठले. गुरुवारी त्यांना सोमलवाड्यातील एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आले. तेथून आरोपी रतन रायने त्यांना पॅरेडाईज सोसायटीतील एका पॉश घरी नेले. हे आपलेच आहे, असे सांगून आरोपीने शर्मा दाम्पत्याचा विश्वास जिंकला. पैसे दिल्यानंतर राय आपल्या मुलाची अॅडमिशन एमबीबीएसला करून देईल, असा विश्वास बसल्याने शर्मा दाम्पत्याने रॉयने पाठविलेल्या माणसांच्या हाती १० लाखांची रक्कम सोपवली. ती रक्कम ताब्यात घेताच आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी मोबाईल नंबर बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
देशभर रॅकेट
अशा प्रकारे फसवणूक करणाºया रॅकेटचे नेटवर्क देशभर पसरले असून, लोकमतने यापूर्वीही या रॅकेटच्या फसवणुकीचे किस्से प्रकाशित केले आहे. या रॅकेटने आतापर्यंत शेकडो जणांची अशी फसवणूक केली आहे. तीन महिन्यांपूर्वी सीताबर्डी ठाण्यातही अशाच प्रकारे गुन्हा दाखल झाला होता, हे विशेष !