गुंतवणूकीचे आमीष, पती-पत्नीसह ८ जणांना ६२ लाखांनी गंडविले
By दयानंद पाईकराव | Updated: June 26, 2024 17:02 IST2024-06-26T16:59:56+5:302024-06-26T17:02:53+5:30
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Lure of investment, 8 persons including husband and wife were cheated of 62 lakhs lakhs
नागपूर : कपड्याच्या कारखान्यात गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होणार असल्याचे आमीष दाखवून पाच आरोपींनी पती-पत्नीसह आठ जणांना ६२ लाख ९१ हजार ४०३ रुपयांनी गंडविले. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
श्वेता मोरेश्वर निमजे (२७, रा. नंदनवन), कविता हिरेश कावडे (४०, रा. श्रीकृष्ण नगर, नंदनवन), कांचन मोरेश्वर निमजे (३२, रा. नंदनवन), सिध्दार्थ चंद्रकांत ठबारे (३५, रा. विद्यानगर, नंदनवन) आणि हिरेश कावडे (४२, रा. विद्यानगर, श्रीकृष्णनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील फिर्यादी योगेश नरेंद्र पशीने (३५, रा. नंदनवन झोपडपट्टी) व त्यांची पत्नी प्रियंका यांची बचतगटाच्या माध्यमातून आरोपींसोबत ओळख होती.
आरोपींनी पशीने व त्यांच्या पत्नीला विश्वासात घेऊन कोल्हापूर येथील कपड्याच्या कारखान्यात गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असे आमीष दाखविले. त्यामुळे पशीने दाम्पत्याने आरोपींना २१ लाख रुपये दिले. परंतु आरोपींनी पशीने दाम्पत्याला कोणताही लाभ दिला नाही, तसेच त्यांची रक्कमही परत न करता त्यांची फसवणूक केली. आरोपींना आणखी ८ जणांकडून ६२ लाख ९१ हजार ४०३ रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४०६, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.