ठेलेवाल्याचे साहित्य मातीत गाडण्याचे प्रकरण दडपण्यासाठी पैशाचे आमिष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 12:19 PM2023-03-24T12:19:31+5:302023-03-24T12:26:18+5:30

सोशल मीडियावर ऑडिओ क्लीप व्हायरल : तक्रार मागे घेण्यासाठी ठेलेवाल्यावर दबाव

lure of money to hide the action taken for g 20 summit in nagpur of throwing stuff on roadside thelawalas | ठेलेवाल्याचे साहित्य मातीत गाडण्याचे प्रकरण दडपण्यासाठी पैशाचे आमिष

ठेलेवाल्याचे साहित्य मातीत गाडण्याचे प्रकरण दडपण्यासाठी पैशाचे आमिष

googlenewsNext

नागपूर : शहरात जी-२० च्या आयोजनादरम्यान विदेशी पाहुण्यांसमोर गरिबीचे प्रदर्शन नको, श्रीमंतीचेच प्रदर्शन व्हावे, यासाठी महापालिकेच्या धरमपेठ झोनच्या अतिक्रमण विभागाने रस्त्यावर चहा, उसाचा रस विकून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांचे सामान उद्ध्वस्त केले. जप्त केलेले सगळे साहित्य चक्क मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबून टाकले. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता प्रकरण अंगलट येणार म्हणून नुकसान झालेल्या रस विकणाऱ्याला माजी नगरसेवकांच्या माध्यमातून ४० हजार रुपये देऊन तक्रार मागे घेण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. याबाबतची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

यात माजी नगरसेवक कमलेश चौधरी आपल्या समर्थकाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला ४० हजार रुपये घेण्यासाठी आग्रह करीत असल्याबाबतचे संभाषण आहे. पैसे देण्याबाबत राजकारण होईल. मात्र, यात नुकसान ठेलेवाल्याचे होईल. आतापर्यंत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमणात ठेले हटविलेल्या कुणालाही पैसे दिले आहेत का, असा सवाल चौधरी यांनी या क्लीपमध्ये केला आहे. तर ठेलेवाला म्हणतो मी पैसे ठेवत नाही. यावर चौधरी म्हणतात, ‘मोठ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मी पैसे मागितले. त्यांनी पाठविले आहे. यात इतका विचार करण्याची गरज नाही.’ यावर संभाषणातील व्यक्ती म्हणतो, ‘इतरांचेही नुकसान झाले आहे. पैसे आता देऊ नका, सकाळी द्या.’ यावर चौधरी म्हणाले, ‘पैसे ठेवून घ्या आणि हा विषय येथे संपवा.’

आता आम्ही दगड माती खायचं का?; जी- २० परिषद नागपुरात.. पण त्याचा फटका 'या' गोरगरीबांना

प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर..

जी २० परिषदेच्या नावावर शहरात स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाची मोहीम राबवताना, नागपुरातील फुटपाथ दुकानदारांना प्रशासनाने लक्ष्य केले आहे. अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली त्यांचा माल माल तर जप्त केला; पण कारवाईच्या नावाखाली त्यांच्या उपजीविकेची त्याची इतर साधने उद्ध्वस्त करण्याचा अमानवीय प्रकार सेमिनरी हिल्स परिसरात घडला. धरमपेठ झोन कर्मचाऱ्यांनी गरीब फुटपाथ दुकानदारांचे ठेले आणि दुकानातील साहित्य व माल जप्त करून सरळ मातीच्या ढिगाऱ्यात दाबून टाकले. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्याने सर्वस्तरातून मनपा प्रशासनावर टीका झाली. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

प्रकरण अंगलट येणार म्हणून मनपाच्या अधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या माध्यमातून संबंधित ठेलेवाल्याला पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचे या ऑडिओ क्लीपमधील संभाषणातून दिसून येते. या संदर्भात कमलेश चौधरी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु, तो होऊ शकला नाही. यामुळे ऑडिओ क्लीपमधील आवाज चौधरी यांचाच आहे की नाही, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

Web Title: lure of money to hide the action taken for g 20 summit in nagpur of throwing stuff on roadside thelawalas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.