लबाड लांडग्याच्या संशोधनाबाबतही ‘लबाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:05 AM2021-09-11T04:05:57+5:302021-09-11T04:05:57+5:30

निशांत वानखेडे नागपूर : लाेकपरंपरेत लबाड म्हणून ओळख असलेला आणि बालसाहित्यात अनेक कथांमधून भेटणारा लांडगा (कॅनिस ल्युपस) आता नामशेषच ...

'Lying' about wolf research | लबाड लांडग्याच्या संशोधनाबाबतही ‘लबाडी’

लबाड लांडग्याच्या संशोधनाबाबतही ‘लबाडी’

Next

निशांत वानखेडे

नागपूर : लाेकपरंपरेत लबाड म्हणून ओळख असलेला आणि बालसाहित्यात अनेक कथांमधून भेटणारा लांडगा (कॅनिस ल्युपस) आता नामशेषच हाेण्याच्या मार्गावर आहे. गुजरात, राजस्थान, हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांत वावर असलेल्या लांडग्याची संख्या संपूर्ण देशात जेमतेम २५०० ते ३००० पर्यंत शिल्लक राहिली आहे. कुत्र्याच्या कुळात माेडणारा पण हिंस्र प्राणी म्हणून ओळख आहे. सरकारी पातळीवर कधी संशोधन, सर्वेक्षण न झाल्याने लांडग्याची याेग्य माहितीही मिळणे कठीण आहे.

जगभरात लांडगावर्गीय जातीच्या एकूण ३७ उपजाती आढळतात. भारतात लांडग्यांच्या तीन उपजाती आढळतात. यामध्ये ल्युपस पॅलिपीस हा भारतीय लांडगा, ल्युपस चँको हा तिबेटी लांडगा, तर ल्युपस ल्युपस हा युरोपियन लांडगा आहे. लांडगा, कुत्रा आणि कोल्हा हे तिन्हीही प्राणी सारखे दिसतात. तोंडाकडे निमुळते होत आलेले लांब डोके, टाेकदार उभे कान, झुपकेदार शेपूट व बारीक पाय लांडग्याच्या शरीराची ठेवण असते. महाराष्ट्रातील सगळ्याच जंगलात लांडगे आढळतात. ते गावकुसाबाहेर उघड्या माळरानावर सुद्धा वावरतात. लांडगे दिवसा व रात्री केव्हाही शिकार करतात. दाट जंगलात हरिण, भेकरं, चितळ हे लांडग्याचे खाद्य असते, तर प्रसंगी मोर व इतर पक्षीदेखील लांडग्यांचे सावज बनतात.

- अमेरिकेतील कॅलिफाेर्निया विद्यापीठाचे डेव्हीस यांनी पहिल्यांदाच भारतीय लांडग्याच्या जीनोमचा अभ्यास केला.

- मॉलेक्युलर इकोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेले निष्कर्षानुसार भारतीय लांडगा जगातील सर्वात धोकाग्रस्त प्रजातीत येताे. लांडग्याची संख्या पूर्वीपेक्षा किती तरी जास्त संकटात येऊ शकते, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

- भारतीय लांडगे लांडग्यांच्या प्रजातीत सर्वांत प्राचीन जिवंत वंशाचे प्रतिनिधित्व करतात.

- यूसी डेव्हिस स्कूल ऑफ वेटरनरी मेडिसिनच्या पर्यावरणशास्त्र संवर्धन युनिटमध्ये डॉक्टरेटची विद्यार्थिनी लॉरेन हेनेली यांच्या मते, ‘लांडगे हे पाकिस्तानमधील शेवटच्या मोठ्या मांसाहारी प्राण्यांपैकी एक आहेत आणि भारतातील अनेक मांसाहारी प्राणी धोक्यात आले आहेत.’

- भारतीय लांडगे जे सध्या देशात टिकून आहेत, त्यांचे व गवताळ प्रदेशांच्या संवर्धनासाठी निसर्गप्रेमी, स्वयंसेवी संस्था, वनविभाग ग्रामस्तरावर, महत्त्वाची पावले उचलणे गरजेचे आहे.

जंगलाचा कमी होणारा आकार, जंगलात मानवाचा वाढता वावर, अधिवास विखंडन आणि अवनती यातून लांडग्याच्या परिसंस्थेत अनेक प्रतिकूल बदल झालेत. वाघ, बिबट, अस्वलाच्या पंगतीत आपण लांडग्याला स्थान न दिल्यामुळे लांडग्यावर ही वेळ आली आहे. नामशेष होत जाणाऱ्या लांडग्याला अभय मिळाले तर हा जंगलाचा सरदार त्याचे आयुष्य उत्तमरीत्या जगेल. व्याघ्र संवर्धनासह इतर प्राण्यांच्या संवर्धनावरही भर देणे ही काळाची गरज आहे.

- यादव तरटे पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

Web Title: 'Lying' about wolf research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.