कृतार्थ आयुष्याची संध्याकाळ मैत्री गौरव पुरस्काराने सन्मानित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 11:17 AM2019-12-30T11:17:33+5:302019-12-30T11:18:24+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मा.गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना मैत्री गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुष्याची संध्यकाळ सारेच अनुभवतात. पण सामाजिक कार्यात वाहून घेतलेल्या एखाद्या कृतार्थ आयुष्याची संध्याकाळ गौरवाने दरवळत असेल तर समाजमनही टवटवीत झाल्याखेरीज राहत नाही. असाच काहीसा अनुभव रविवारी मैत्री परिवार संस्थेच्या वतीने आयोजित मैत्री गौरव पुरस्कार सोहळ्यात नागरिकांनी अनुभवला. निमित्त होते मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या गौरव समारंभाचे!
मुंडले सभागृहात सायंकाळी हा समारंभ आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या उपस्थितीत पार पडला. व्यासपीठावर मैत्री परिवाराचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रा. प्रमोद पेंडके, उपाध्यक्ष विजय शहाकार उपस्थित होते. २१ हजार रुपयांचा धनादेश, मानपत्र, शाल-श्रीफळ देऊन त्यांचा मैत्री गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला.
आपल्या सत्कारादाखल आशीर्वचन देताना ‘अनासायेन मरणं, विना दैन्येन जीवन्मं’ हे सुभाषित सांगून मा.गो. वैद्य म्हणाले, आयुष्यात कधी लाचारी केली नाही. नोकरीसाठी अर्जही न करता सात नोकरी केल्या. फक्त पब्लिक सर्व्हिस कमिश्नरकडेच अर्ज केला. पुढे चार महिन्यांनी आपण सत्याग्रहात सहभागी झालो. २०१७ मध्ये अपंगत्वाच्या रूपाने एक मित्र भेटला. आता दुसऱ्या मित्राची आतुरतेने वाट बघतोय. मृत्यूला आपण मित्र मानतो, त्याचीच आता वाट बघतोय. मैत्री संस्थेने केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त के ला. आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी मा.गो. यांच्या सेवामयी आयुष्याचा गौरव केला. ते म्हणाले, हिमालयापेक्षा उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या बाबूरावांची ही गोवर्धनपूजाच आहे. ज्याच्या जीवनात सिद्धता असते तेच मृत्यूशी बोलतात व त्याला घाबरवतातही. मृत्यूला मित्राची व्याख्या देणाऱ्या पुरुषार्थाचे हे पूजन आहे. मा.गो. हे नागपूरचेच वैभव नसून देशाची प्रतिष्ठा आहेत. बाबूरावांमध्ये हेडगेवारांचे प्रतिबिंब दिसते, असा उल्लेख त्यांनी केला. प्रास्ताविक संजय भेंडे यांनी केले तर आभार प्रमोद पेंडके यांनी मानले. मानपत्रवाचन मृणाल पाठक यांनी व संचालन प्रा. माधुरी यावलकर यांनी केले. समारंभाला मा.गो. वैद्य यांच्या सहचारिणी आणि जितेंद्रनाथ महाराजांचे आई-वडील प्रामुख्याने उपस्थित होते.
सन्मानाची रक्कम मैत्री संस्थेला
सन्मानादाखल संस्थेकडून मिळालेल्या २१ हजार रुपयांच्या रकमेत स्वत:कडील पाच हजार रुपयांची भर घालून २६ हजार रुपयांची रक्कम मैत्री संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी देत असल्याचे वैद्य यांनी जाहीर केले. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना सहकार्य व्हावे, यासाठी ही मदत देत असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले.