यंत्र आले, पण निधी नाही : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 08:34 PM2019-03-11T20:34:25+5:302019-03-11T20:35:32+5:30
वैद्यकीय यंत्राच्या खरेदीला मान्यता मिळताच शासनाचा निधी प्रथम रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो. नंतर यंत्र खरेदीचे अधिकार असलेल्या हाफकिन महामंडळाकडे निधी हस्तांतरित केला जातो. नंतर यंत्राची खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन रुग्णालयाला यंत्र प्राप्त होते. ही सर्वसामान्य प्रक्रिया आहे. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये याच्या उलटे झाले आहे. निधी न मिळता प्रस्तावित यंत्र आल्याने ‘सुपर’ अडचणीत सापडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीय यंत्राच्या खरेदीला मान्यता मिळताच शासनाचा निधी प्रथम रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो. नंतर यंत्र खरेदीचे अधिकार असलेल्या हाफकिन महामंडळाकडे निधी हस्तांतरित केला जातो. नंतर यंत्राची खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन रुग्णालयाला यंत्र प्राप्त होते. ही सर्वसामान्य प्रक्रिया आहे. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये याच्या उलटे झाले आहे. निधी न मिळता प्रस्तावित यंत्र आल्याने ‘सुपर’ अडचणीत सापडले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विदर्भच नाही तर आजूबाजूच्या राज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्याच्या स्थितीत हृदय शल्यचिकित्साशास्त्र, हृदयरोग, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, युरोसर्जरी व एन्डोक्रेनोलॉजी या आठ विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. यात आणखी नव्या विभागाची भर पडावी व रुग्णांना अद्यावत उपचार मिळावे म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. यातील दर वर्षी २० कोटी रुपये खर्च केले जाणार होते. त्यानुसार सुपर स्पेशालिटी प्रशासनाने २०१७-१८ साठी आवश्यक यंत्र सामुग्रीचा प्रस्ताव हाफकिन महामंडळाकडे पाठविला. परंतु पहिल्या टप्प्यातील २० कोटी न मिळताच यंत्र यायला सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात सहा फोर्टेबल व्हेन्टिलेटर व हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ११ पेसमेकर आले. ‘एमआरआय’ व ‘डिजिटल रेडिओग्राफी’ यंत्रही लवकरच उपलब्ध होणार आहे. जे यंत्र उपलब्ध झाले, ते स्थापन करण्याचा संबंधित कंपनीने तगादा लावणे सुरू केले आहे. परंतु निधीच मिळाला नसताना यंत्र कसे स्थापन करणार, या अडचणीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सापडले आहे. सूत्रानूसार, यातून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वैद्यकीय शिक्षण विभागाशी संपर्क साधणार आहे. परंतु तूर्तास दोन्ही यंत्र रुग्णालयात पडून आहेत.