मॅडम अडकल्या नाशकात, ५३ कर्मचारी पगाराविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 08:12 PM2020-04-22T20:12:03+5:302020-04-22T20:17:13+5:30
पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक आणि मध्यवर्ती संग्रहालया(अजब बंगला)च्या अभिरक्षक जया वाहणे लॉकडाऊनमुळे नाशिकमध्ये अडकल्या. परिणामत: या दोन्ही कार्यालयातील सुमारे ५३ कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार अडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक आणि मध्यवर्ती संग्रहालया(अजब बंगला)च्या अभिरक्षक जया वाहणे लॉकडाऊनमुळे नाशिकमध्ये अडकल्या. परिणामत: या दोन्ही कार्यालयातील सुमारे ५३ कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार अडला आहे. बिलावर स्वाक्षरीच न झाल्याने एप्रिल महिन्याचाही पगार होण्यासंदर्भात अनिश्चितता व्यक्त होत आहे.
येथील अजब बंगलामध्ये ३३ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात २३ कर्मचारी नियमित असून, १० कर्मचारी बाह्ययंत्रणेमार्फत नियुक्त आहेत, तर पुरातत्त्व विभागामध्ये २० कर्मचारी आहेत. मध्यवर्ती संग्रहालय असलेल्या अजब बंगलामध्ये वाहणे या अभिरक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या स्वाक्षरीनेच कर्मचाऱ्यांचे पगार निघतात. वाहणे यांचे कुटुंबीय नाशिकला असल्याने त्या नेहमीच स्वगावी जात असतात. अशातच २० मार्चला लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या काळात त्या नाशिकमध्ये होत्या. तेव्हापासून त्या नागपुरात परत येऊ शकल्या नाही. परिणामत: मार्च महिना उलटून गेला तरी त्यांची ईएफटी बिलावर स्वाक्षरी झाली नाही. यामुळे मार्च महिन्याचे कर्मचाऱ्यांचे वेतन निघू शकले नाही. आता एप्रिल संपायलाही केवळ एक आठवडा शिल्लक आहे. या महिन्याचेही ईएफटी बिल न गेल्याने या महिन्याचेही पगार निघण्याची शक्यता राहिलेली नाही.
ही परिस्थिती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अलीकडेच कर्मचाऱ्यांनी पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये संचालनालयाच्या संचालकांकडे एक अर्ज पाठविला. त्यात ही परिस्थिती मांडली आहे. वाहणे रुजू होईपर्यंत विशेष बाब म्हणून येथील सहायक अभिरक्षक वि. ना. निट्टूरकर यांच्याकडे तात्पुरता प्रभार सोपवावा आणि त्यांच्या माध्यमातून पगारपत्रकावर स्वाक्षऱ्या करून ईएफटी बिल सादर केले जावे, अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेतच आहेत.
माझी मुलगी आणि सासू नाशिकला असल्याने आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे अडकले. कर्मचाऱ्यांच्या वेतनाची काळजी मलाही आहे. अंतर लांब असल्याने आणि येण्याची व्यवस्था नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. वरिष्ठांकडे ही अडचण मांडली आहे.
- जया वाहणे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग, नागपूर