केले आताच अवघे शतक पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:36 AM2018-03-08T11:36:48+5:302018-03-08T11:37:00+5:30

१०२ वर्षे वयाच्या मनोरमा नरहर सहस्रबुद्धे आणि १०१ वर्षांच्या शांता रामचंद्र लोटे. जागतिक महिला दिनानिमित्त अलीकडेच त्यांची भेट घेतली.

Made just a hundred centuries | केले आताच अवघे शतक पार

केले आताच अवघे शतक पार

googlenewsNext
ठळक मुद्देया दोघीही दोन-चार वर्षापूर्वीपर्यंत सूर्यनमस्कार घालीत होत्या

वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: चेहऱ्यावर गोडसर प्रेमळ हास्य... आवाजात एक लयबद्ध थरथरते मार्दव... हालचालीत एक संयत चपळता आणि आयुष्याप्रती काठोकाठ भरलेला सहजभाव. झाले गेले विसरून जायचे आणि आजचा स्वीकार पूर्णत्वाने करायचा या जीवनमंत्राने दिलेली साथ... बालपणाच्या आठवणींचे अखंड झरणारे स्मरण चांदणे आणि जीव लावणाऱ्या आप्तजनांचा सभोवती असलेला आश्वस्त वावर. हे सगळे वर्णन आहे वयाची शंभरी पार केलेल्या दोन उत्साहमूर्तींचे. १०२ वर्षे वयाच्या मनोरमा नरहर सहस्रबुद्धे आणि १०१ वर्षांच्या शांता रामचंद्र लोटे. जागतिक महिला दिनानिमित्त अलीकडेच त्यांची भेट घेतली.
वयाच्या शंभरी गाठलेल्या व्यक्तीमधील ऊर्जा मावळलेली असते, या समजाला पार धुळीला मिळवील असा दिनक्रम या दोघींचा आहे. पहाटेच उठणे, प्राणायाम, बसल्या बसल्या पायांचे व्यायाम, (या दोघीही दोन-चार वर्षापूर्वीपर्यंत सूर्यनमस्कार घालीत होत्या), दूध किंवा सूप असा हलका आहार. स्नान स्वत: करतात. मनोरमाआजी तर स्वत:चे लुगडे स्वत: धुतात. नंतर देवपूजा. शांता आजी दुपारी जप करतात, भजन म्हणतात किंवा आराम करतात. मनोरमाआजी वाचन करतात. वीणकाम करतात. त्यांची दृष्टी अजूनही चांगली आहे. दोघींनाही गाढ व लगेचच झोप लागते. त्यांना कुठलाही निद्रानाशाचा त्रास नाही. मधुमेह, रक्तदाब असे काहीही नाही.दोघींचाही प्रवास तसा समांतर झालेला. मनोरमाआजींचा जन्म २४ एप्रिल १९१५ चा तर शांताआजींचा १ जुलै १९१७ चा. त्यांचे लहान वयात लग्न झाले. संयुक्त कुटुंबाची जबाबदारी दोघींनीही पेलली. आयुष्यातले अनेक चढउतार, दु:खाचे प्रसंग, कष्टाचे दिवस, जोडीदाराचे जाणे, पोटच्या मुलांचे अकाली मृत्यू, हलाखीची परिस्थिती असे सगळेच या दोघींनी अनुभवले आहे. मात्र त्यांच्या चेहऱ्यांवर ताज्या फुलाचे हास्य सदैव विलसत असलेले आपण केव्हाही पाहू शकतो. महिला दिनाचा समस्त स्त्रीवर्गाला दोघी देत असलेला हाच तो संदेश असावा.

Web Title: Made just a hundred centuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.