मध्य प्रदेशातील व्यक्तीची नागपुरात हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 01:02 AM2019-09-15T01:02:34+5:302019-09-15T01:03:59+5:30
केसाचा उपचार करण्याच्या बहाण्याने नागपुरात आलेल्या मध्य प्रदेशातील एका व्यक्तीची त्याच्या भाडेकरूने दगडाने ठेचून हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास हा थरार घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केसाचा उपचार करण्याच्या बहाण्याने नागपुरात आलेल्या मध्य प्रदेशातील एका व्यक्तीची त्याच्या भाडेकरूने दगडाने ठेचून हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास हा थरार घडला. रामलाल दद्दीप्रसाद जैस्वाल (वय ४१) असे मृताचे नाव आहे. ते मध्य प्रदेशातील रिवा येथे राहत होते.
रामलाल जैस्वाल मूळचे नागपूरचे असून, कळमन्यातील आदर्शनगरात त्यांचे स्वत:चे घर आहे. त्यांना दोन पत्नी असल्याचे पोलीस सांगतात. येथील घर आरोपी अंकुश जैस्वाल याला भाड्याने देऊन ते रिवा येथे राहायला गेले. केसाचा उपचार करण्यासाठी ते दोन दिवसांपूर्वी नागपुरात आले. एका नातेवाईकाकडे मुक्कामी थांबलेले जैस्वाल भाडेकरू अंकुशकडे शुक्रवारी रात्री घरभाडे मागण्यासाठी गेले. त्यांनी त्याला घरभाडे मागितले. अंकुशने घरभाडे तुमच्या पहिल्या पत्नीला देतो, असे सांगून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. तुला घर मी भाड्याने दिले, तू मला न विचारता पत्नीला घरभाडे कसे देतो, अशी विचारणा करून जैस्वाल यांनी अंकुशला खडसावले. त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढत गेला आणि अंकुश तसेच त्याच्या साथीदारांनी रामलाल जैस्वाल यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यावर दगडाने ठेचून त्यांना ठार मारले. आरडाओरडीमुळे मोठा जमाव जमला. मात्र, रामलाल यांची कुणी मदत केली नाही. आरोपी पळून गेल्यानंतर कळमना पोलीस तेथे पोहचले. त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपी अंकुश आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
कळमना निरंकुश
देशभरात प्रसिद्ध असलेल्या कळमना मार्केटच्या परिसरातच कळमना पोलीस ठाणे आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे कळमन्यातील गुंडगिरी उफाळून आली आहे. तृतीयपंथी चमचमच्या हत्याकांडापासून येथे गंभीर गुन्हे घडण्याची मालिकाच लागली आहे. व्यापाऱ्यावर हल्ले करून लुटण्याचेही प्रकार नेहमीच घडतात. कळमना पोलिसांनी कोणतीही मोठी कामगिरी बजावल्याची अलीकडे नोंद नाही. अवैध धंदे वाढले आहेत. मार्केट परिसरातच गुन्हेगार, चोर-भामटे फिरताना दिसतात. गुन्हेही करतात. लाखोंच्या सुपारीचे वारेन्यारे येथूनच होते. कळमन्याचे ठाणेदार आणि पोलीस नेमके काय करतात, तोच तपासाचा विषय झाला आहे.