नागपुरात मध्य प्रदेशातील वृद्धाला तोतया पोलिसांनी लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 10:48 PM2018-10-23T22:48:15+5:302018-10-23T22:49:33+5:30
लहान भावाच्या उपचारासाठी नागपुरात आलेल्या मध्य प्रदेशातील एका वृद्धाला तोतया पोलिसांनी लुटले. त्यांच्याजवळचे रोख ४० हजार आणि सोनसाखळी असा ९० हजारांचा ऐवज लुटारूंनी लंपास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लहान भावाच्या उपचारासाठी नागपुरात आलेल्या मध्य प्रदेशातील एका वृद्धाला तोतया पोलिसांनी लुटले. त्यांच्याजवळचे रोख ४० हजार आणि सोनसाखळी असा ९० हजारांचा ऐवज लुटारूंनी लंपास केला. मंगळवारी सकाळी बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्पतरू हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. राजकुमार गोविंदराव अग्रवाल (वय ६४) असे पीडित वृद्धाचे नाव आहे.
अग्रवाल शिवनी (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत. त्यांच्या लहान भावाच्या उपचारासाठी ते नागपुरात आले होते. प्रतापनगर सिमेंट मार्गावरील गायत्री भोजनालयाजवळ चहा घेऊन ते कल्पतरू हॉस्पिटलकडे जात असताना मंगळवारी सकाळी ९.२० वाजता त्यांना दोन लुटारूंनी रोखले. आम्ही पोलीस आहोत, तुम्ही गांजाची तस्करी करता, असे म्हणत त्यांनी अग्रवाल यांना तलाशी घ्यायची आहे, असे म्हटले. अग्रवाल यांनी विरोध केला असता लुटारूंनी त्यांना आपले बनावट ओळखपत्र दाखवले. त्यांना धमकावल्यानंतर अग्रवाल यांच्या खिशातील ४० हजार रुपये काढून घेतले. या भागात मोठ्या प्रमाणात लुटमार सुरू आहे, असा धाक दाखवून लुटारूंनी अग्रवाल यांच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी काढून रुमालात बांधून ठेवा, असे म्हटले. त्यानंतर स्वत:च अग्रवाल यांच्या हातातून रुमाल आणि सोनसाखळी घेऊन त्याची गाठ पाडताना लक्ष विचलित करून लुटारूंनी रोख तसेच सोनसाखळी लंपास केली. रिकाम्या रुमालाची गाठ बांधून ती अग्रवाल यांना सोपवून लुटारू पळून गेले. काही वेळेनंतर अग्रवाल यांनी रुमालाची गाठ उघडली असता त्यांना त्यात काहीच आढळले नाही. लुटले गेल्याचे लक्षात आल्याने अग्रवाल यांनी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. हवालदार राजू बावणे यांनी गुन्हा दाखल केला असून, लुटारूंचा शोध घेतला जात आहे.
चार दिवसातील दुसरी घटना
अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे वृद्ध व्यक्तींना फसवून त्यांची रक्कम लुटल्याची चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. १९ आॅक्टोबरला पंचशील चौकात कोल्हापूर जिल्ह्यातील एका वृद्धाला अशाच प्रकारे पोलीस असल्याचे सांगून एका आरोपीने लुटले होते. त्याचा शोध लागायचा असतानाच आता पुन्हा ही घटना घडली.