माडी वरती उभी राहुनी वाट पाहिली काल...एकापेक्षा एक सरस लावण्यांनी गाजला 'युवारंग'
By जितेंद्र ढवळे | Published: March 20, 2024 05:43 PM2024-03-20T17:43:50+5:302024-03-20T17:44:04+5:30
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी लावणी नृत्य स्पर्धा पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लावणीला उपस्थितांनी दाद दिली.
नागपूर : माडी वरती उभी राहुनी वाट पाहिली काल... वाटलं होतं तुम्ही याल.. राया, नटले तुमच्यासाठी, चंद्रा अशा एकापेक्षा एक सरस लावणी नृत्य सादर करीत विद्यार्थ्यांनी 'युवारंग' गाजविला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 'युवारंग' युवा महोत्सव स्थानिक अंबाझरी रोडवरील गुरुनानक भवन येथे सुरू आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी लावणी नृत्य स्पर्धा पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लावणीला उपस्थितांनी दाद दिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 'युवारंग' हा युवा महोत्सव १९ मार्च ते २२ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक लोककला असलेल्या लावणी स्पर्धा युवा महोत्सवात घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण ६५ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. लावणी नृत्य स्पर्धेमध्ये मुलींबरोबर मुलांनीदेखील सहभागी होत एकापेक्षा एक सरस लावणी प्रस्तुत केली. यामध्ये 'कुण्या गावाचं आलं पाखरू, ही लावणी शासकीय न्याय वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी देशमुख हिने सादर केली. हिस्लॉप महाविद्यालयाची विद्यार्थिनी आर्या धनविजय, फार्मसी कॉलेज, बोरगाव येथील श्रेया ठाकरे, निकालास महिला महाविद्यालयाची श्रद्धा काकडे, वैष्णवी मालवे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी आपल्या लावणी नृत्यातून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांनी फुलला शैक्षणिक परिसर
युवा महोत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठ परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतून विद्यार्थी-विद्यार्थिनी 'युवारंग' मध्ये सहभागी होत आहेत. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमुळे नागपूर विद्यापीठाचा शैक्षणिक परिसर फुलून गेला आहे. विविध महाविद्यालयांतून तब्बल १२०० ते १५०० विद्यार्थी या युवा महोत्सवात सहभागी होत आहेत.