वाघाला पेढे खाऊ घालायचे आहे म्हणत वेड्याने महाराज बागेत उडविली धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:33 AM2020-02-08T00:33:52+5:302020-02-08T00:35:38+5:30
वाघाला पेढे खाऊ घालायचे आहेत, मला वाघाला भेटू द्या, असे म्हणत शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एका वेडसर इसमाने महाराज बाग प्राणिसंग्रहालयात शिरून धमाल उडवून दिली. यामुळे काही काळ बराच गोंधळ माजला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाघाला पेढे खाऊ घालायचे आहेत, मला वाघाला भेटू द्या, असे म्हणत शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एका वेडसर इसमाने महाराज बाग प्राणिसंग्रहालयात शिरून धमाल उडवून दिली. यामुळे काही काळ बराच गोंधळ माजला. अखेर तो वेडसर असल्याचे लक्षात आल्यावर त्याला सोडून देण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री महाराज बाग प्राणिसंग्रहालय बंद झाल्यावर १० वाजताच्या सुमारास एक व्यक्ती आत शिरली. हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यावर त्याला हटकण्यात आले. मात्र तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने त्याला पकडून चौकशी करण्यात आली. त्यावर, आपणास वाघाला पेढा खाऊ घालायचा आहे, मला जाऊ द्या, त्याला भेटू द्या, असे त्याने सांगितले. त्याची ही जगावेगळी मागणी ऐकून वेगळीच शंका आली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यांनी तातडीने पोहचून परिस्थिती समजून घेतली. सीताबर्डी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली.
या दरम्यान त्या व्यक्तीच्या खिशात एक ओळखपत्र दिसले. त्यावरील क्रमांकावर संपर्क साधला असता त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला. संबंधित व्यक्ती वेडसर असून बरेचदा अशा प्रकारचे कृत्य करते, असे सांगण्यात आले. त्याच्यापासून प्राणिसंग्रहालयाला काही धोका नसल्याचे लक्षात आल्यावर काही वेळाने त्याला सोडून देण्यात आले. दरम्यान सीताबर्डी पोलीस पोहचले. मात्र ते येण्यापूर्वीच त्याला सोडून देण्यात आले होते.
ही व्यक्ती महाराज बाग प्राणिसंग्रहालयात शिरली होती. तिची चौकशी केल्यावर वेडसर असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसात माहिती देऊन चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आले.
डॉ. सुनील बावसकर, प्रभारी, महाराज बाग प्राणिसंग्रहालय.
यापूर्वी विमानतळावरही घातला होता गोंधळ
या व्यक्तीने यापूर्वी नागपूर विमानतळावर प्रवेश करून असाच गोंधळ घातल्याचे यावेळी त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्याच्या या कृत्यामुळे कुटुंबीयही तणावात असून ही दुसरी वेळ असल्याचे सांगण्यात आले.