आदिवासींच्या समृद्धीसाठी माफसूचे मत्स्यबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:26 AM2017-09-10T01:26:23+5:302017-09-10T01:26:35+5:30

नक्षलवाद म्हटले की आधी डोळ्यासमोर येतो गडचिरोली जिल्हा! मात्र या जिल्ह्यातील आदिवासीपर्यंत समृद्धी आणि कौशल्य पोहोचविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध प्रकल्प हाती घेतले आहे.

Mafsu fish seeds for the prosperity of tribals | आदिवासींच्या समृद्धीसाठी माफसूचे मत्स्यबीज

आदिवासींच्या समृद्धीसाठी माफसूचे मत्स्यबीज

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारची संकल्पना : माफसू देणार प्रशिक्षण

जितेंद्र ढवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नक्षलवाद म्हटले की आधी डोळ्यासमोर येतो गडचिरोली जिल्हा! मात्र या जिल्ह्यातील आदिवासीपर्यंत समृद्धी आणि कौशल्य पोहोचविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध प्रकल्प हाती घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्यात मत्स्यशेतीचे मॉडेल ठरावे यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तांत्रिक शाखेने पुढाकार घेतला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार आदिवासी युवक आणि शेतकºयांना मत्स्यशेतीकडे वळविण्यासाठी आणि यामाध्यतून त्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याचा भार महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) उचलला आहे.
केंद्र सरकारच्या ‘मत्स्यपालन तांत्रिक पद्धती’या प्रकल्पांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे या अभिनव प्रयोगाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पांतर्गत माफसूची चमू कुरखेडा येथे सर्वेक्षण करून इच्छुक मस्त्यपालकांची निवड करतील. त्यांना मत्स्यशेतीबाबतचे अद्ययावत प्रशिक्षण देतील. इतकेच काय तर या मत्स्यपालक शेतकºयांना विद्यापीठाच्यावतीने मत्स्यबीजही उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आदिवासी युवकांसाठी हा समृद्धीचा मार्ग ठरेल, असा विश्वास माफसूच्या संशोधन विभागाचे संचालक डॉ. जयंत कोरडे यांनी व्यक्त केला.
मत्स्यशेतीवर आराखडा
विदर्भात मत्स्यपालन आणि मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. यासाठी विदर्भात जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात पाण्याची उपलब्धता, त्याचा प्रकार, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे मासे मत्स्यशेतीस पोषक ठरू शकतात याचे अध्ययन करण्यात येणार आहे. यासोबतच आंतरराज्यीय मत्स्यसंवर्धन आणि कौशल्य विकास प्रकल्पाच्या माध्यमातून फिशर मॅनचे प्रशिक्षण यावरही भर देण्यात येईल. हा प्रकल्प आराखडा तयार करण्याची जबाबदारी माफसूवर सोपविण्यात आली आहे.

Web Title: Mafsu fish seeds for the prosperity of tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.