‘माफसू’ला घ्याव्या लागणार सर्वच वर्षांच्या परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 10:30 AM2020-06-15T10:30:48+5:302020-06-15T10:32:04+5:30
‘माफसू’तील नियमानुसार पदवीसाठी सर्व वर्षांचे गुण पाहण्यात येतात. त्यामुळे ‘माफसू’ला सर्वच वर्षांच्या परीक्षा घेणे अनिवार्य आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे ‘माफसू’तर्फे (महाराष्ट्र अॅनिमल अॅन्ड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी) सर्व उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेता इतर अकृषी विद्यापीठांप्रमाणे अंतिम वर्ष सोडून इतर सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु ‘माफसू’तील नियमानुसार पदवीसाठी सर्व वर्षांचे गुण पाहण्यात येतात. त्यामुळे ‘माफसू’ला सर्वच वर्षांच्या परीक्षा घेणे अनिवार्य आहे. अद्यापपर्यंत परीक्षांबाबतची नेमकी स्थिती स्पष्ट न झाल्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमधील संभ्रमदेखील वाढला आहे. तर देशातील इतर पशुवैद्यकीय विद्यापीठांप्रमाणे ‘माफसू’ प्रशासनानेदेखील ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
‘माफसू’मधील अभ्यासक्रम हे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या किमान मापदंडावर आधारित आहे. त्यामुळे परीक्षा प्रणालीत बदल करण्यासाठी परिषदेतर्फे सुधारित दिशानिर्देश जारी झाल्याशिवाय पुढील पावले उचलता येणार नाही. यासंदर्भात देशभरातील विद्यापीठांनी परिषदेला पत्र लिहिले आहे. मात्र दिशानिर्देश जारी करण्यात आलेले नाही. दुसरीकडे विद्यार्थी काळजीत पडले आहेत. अखेरचे वर्ष वगळता इतर वर्षांच्या परीक्षा न घेता थेट विद्यार्थ्यांना ‘प्रमोट’ करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु ‘माफसू’च्या नियमानुसार सर्वच वर्षांच्या गुणांना सारखे महत्त्व आहे. त्यामुळे एखाद्या वर्षाची परीक्षा झाली नाही तर पुढे भविष्यात विद्यार्थ्यांना अडचण जाऊ शकते. अशास्थितीत सर्वच वर्षांची परीक्षा घेणे क्रमप्राप्त असल्याचा शिक्षकांचा सूर आहे. ‘माफसू’तील काही अधिकाऱ्यांनी इतर विद्यापीठांशीदेखील संपर्क केला. इतर विद्यापीठांनीदेखील सध्या कुठलाही अंतिम निर्णय न घेता प्रतीक्षा करण्याचाच निर्णय घेतला आहे. स्थितीत सुधारणा झाल्यानंतर परीक्षा घेता येतील, असा सूर आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान नको
‘माफसू’च्या निकालात सर्व वर्षांच्या गुणांना महत्त्व आहे. त्यामुळे सर्व वर्षांच्या परीक्षा होणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील काम करतात, तसेच विविध आंतरराष्ट्रीय संस्थांशी जुळतात. तेथेदेखील विद्यार्थ्यांच्या या सर्व वर्षांच्या गुण व श्रेणीला महत्त्व असते. विद्यार्थ्यांचे कुठल्याही परिस्थितीत नुकसान व्हायला नको, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या सुधारित दिशानिर्देशांची प्रतीक्षा आहे, असे पशुवैद्यकीयशास्त्र अधिष्ठाता व ‘डायरेक्टर आॅफ इन्स्ट्रक्शन्स’ डॉ. ए.पी. सोमकुंवर यांनी सांगितले.