नागपुरात गडकरींच्या विकासाची जादू चालली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:52 AM2019-05-24T00:52:41+5:302019-05-24T00:55:21+5:30
एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कृपाल तुमाने बाजी मारली आहे. गडकरी हे सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणारे कॉंग्रेसेतर पक्षाचे ते पहिले उमेदवार ठरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कृपाल तुमाने बाजी मारली आहे. गडकरी हे सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणारे कॉंग्रेसेतर पक्षाचे ते पहिले उमेदवार ठरले आहेत.
सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यापासूनच गडकरी आघाडीवर होते. रात्री एक नंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. अठराव्या फेरीनंतर गडकरींना ६ लाख ५२ हजार २४१ (५५.६७ %) इतकी तर कॉंग्रेसचे नाना पटोले यांना ४ लाख ३९ हजार ११४ (३७.४८ %) इतकी मतं मिळाली. या फेरीनंतर गडकरी यांचे मताधिक्य २ लाख १३ हजार १२७ इतके होते. अखेरच्या फेरीनंतर गडकरी सुमारे २ लाख १५ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला.
दुसरीकडे रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना २५ व्या फेरीअखेर ५ लाख ६५ हजार ३६० मतं मिळाली. तर कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांच्या वाट्याला ४ लाख ४५ हजार १५२ मतं आली. या फेरीअखेर तुमाने हे १ लाख २० हजार २०८ मतांनी समोर होते. अखेरच्या फेरीअखेर तुमाने यांचे मताधिक्य सव्वा लाखाहून अधिक झाले होते.
दुपारी निकालाचा कल आल्यानंतरच भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोषाला सुरुवात केली होती. शहरातील विविध भागात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सोबतच कळमना मार्केट यार्ड परिसराजवळदेखील रात्री उशीरा जल्लोष करण्यात आला.
नागपुरातील विजयामुळे गडकरी यांचे केंद्रातील वजन आणखी वाढले आहे. गडकरी यांच्या विजयाचे संपूर्ण श्रेय त्यांच्या विकासकारणाला जात असून नागपुरात झालेल्या विकासकामांची पावती मतदारांनी मतांच्या रुपात त्यांना दिलेली आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात पटोले यांनी गडकरींवर व्यक्तिगत टीकादेखील केली होती. मात्र गडकरी यांनी टीका करण्यापेक्षा आपली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यावरच भर दिला. मागील पाच वर्षांत केंद्रात काम करत असतानादेखील मतदारांशी कायम राखलेला जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी जुळलेली नाळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारसंघातील वेगवान विकासकामे ही गडकरी यांच्या विजयाची प्रमुख कारणे ठरली.