नागपुरातील दोन महिला कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 08:48 PM2020-07-13T20:48:20+5:302020-07-13T20:51:46+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मध्यवर्ती कारागृहातील दोन महिला कैद्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मध्यवर्ती कारागृहातील दोन महिला कैद्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी करण्यात येणार आहे. नूरजहाँ शेख सुभान शेख व सकरू महागू बिंजेवार अशी मृत महिला कैद्यांची नावे आहेत.
३१ मार्च, २०२० रोजी नूरजहाँ शेख सुभान शेख, कैदी क्र. (सी/९६३१/२०२०) या ५० वर्षे वयाच्या मध्यवर्ती कारागृहातील महिला कैदीचा मृत्यू झाला आहे. तर १६ एप्रिल २०२० रोजी सकरू महागू बिंजेवार, कैदी क्र. ( सी/७६७१/२०२०) या ६१ वर्षीय महिला कैद्याचा मृत्यू झाला. मृत्यूबाबत घटनेची कारणे, परिस्थिती, शासन यंत्रणेकडून झालेली दिरंगाई किंवा खोटे अहवाल इत्यादी बाबींवर जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय दंडाधिकारी, नागपूर शहर हे दंडाधिकारीय चौकशी करणार आहेत.
नूरजहाँ शेखबाबत घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी चौकशीत सहभागी होण्यासाठी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह २४ जुलै, २०२० पूर्वी तर सकरू बिंजेवार हिच्या मृत्यूबाबत माहिती असलेल्यांनी ३० जुलैपूर्वी खोली क्र. १ तहसील कार्यालय, नागपूर शहर येथे जमा करण्याचे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी शेखर घाडगे यांनी केले आहे.