नागपूर विभागात महानिशिथकाल मध्यरात्री केवळ ५० मिनिटांचा!
By प्रविण खापरे | Published: February 18, 2023 06:00 AM2023-02-18T06:00:00+5:302023-02-18T06:00:07+5:30
आज महाशिवरात्री : आजपासूनच वसंत ऋतूस होणार प्रारंभ
नागपूर : महाशिवाच्या शक्तीचा आत्मिक बोध होणारा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय. शनिवारी हा पवित्र दिवस असून, नागपूर विभागात संध्याकाळी सूर्यास्तापासून ते रविवारी पहाटे सूर्योदयापूर्वीपर्यंत महाशिवरात्रीचा शुभयोग आलेला आहे. महाशिवरात्रीला अत्यंत महत्त्वाचा असलेला महानिशिथकाल मध्यरात्री १२.१० ते १ वाजतापर्यंत असा केवळ ५० मिनिटांचा असून, या काळात शिवआराधना करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
शनिवारीच शनिप्रदोष असून नागपूर विभागात महाशिवरात्रीचा पहिला प्रहर शनिवारी संध्याकाळी सूर्यास्ताला ६.१९ वाजता, दुसरा प्रहर रात्री ९.२७ वाजता, तिसरा प्रहर मध्यरात्री १२.३५ वाजता तर चौथा प्रहर उत्तररात्री ३.३२ वाजता सुरू होईल. या चारही प्रहरात शिवपुजन करणे अत्यंत फलदायी असल्याचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगीतले. याच दिवशी भद्रा प्रारंभ रात्री ८.०३ वाजता सुरू होत असून भद्रा समाप्ती रविवारी सकाळी ६.११ वाजता होणार आहे.
शनिवारीच शिशिर ऋतूची समाप्ती होत असून भारतीय ऋतूमालिकेतील सर्वात सुरेख अशा वसंत ऋतूस प्रारंभ होत आहे. महाशिवरात्रीच्या पहिल्या प्रहरात ‘ओम श्री शिवाय नम:’, दुसऱ्या प्रहरात ‘ओम श्री शंकराय नम:’, तिसऱ्या प्रहरात ‘ओम श्री महेश्वराय नम:’, चवथ्या प्रहरात ‘ओम श्री रूद्राय नम:’ आणि महानिशिथकालात ‘ओम श्री सांबसदाशिवाय नम:’ असे मंत्रजप करत शास्त्रोक्त विधीने शिवपुजन करण्याचा सल्ला डॉ. अनिल वैद्य यांनी दिला आहे.